मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – न्यायालयीन प्रक्रियेत कधी काय होईल, याचा काही नेम नाही. बरेचदा न्यायालयाच्या चकरा मारताना कित्येक वर्ष निघून जातात. यामध्ये याचिकाकर्ता आणि प्रतिवादी दोघांचाही मृत्यू होऊन जातो, अश्याही घटना घडलेल्या आहेत. अलीकडेच न्यायालयाने एका आरोपीला चक्क मृत्यूनंतर जामीन मंजूर केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
फसवणुकीच्या प्रकरणातील या आरोपीचे नाव सुरेश दत्ताराम पवार असे आहे. हे प्रकरण फार जुने नाही. दोनच वर्षांपूर्वी त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल होऊन कारवाई झाली. त्यानंतर आजारपणामुळे त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज देखील त्याने गेल्याच महिन्यात केला. त्यानंतर त्यावर सुनावणी पण झाली. मात्र विविध कारणांनी जामीन मंजूर होण्यासाठी वेळ लागला. पण त्याच्या दोन दिवस आधीच आरोपाचा मृत्यू झालेला होता. अर्थात न्यायालयाला याची माहितीच देण्यात आली नाही, त्यामुळे न्यायालयाने नियमीत प्रक्रियेमध्ये आरोपीला जामीन मंजूर केला. सुरेश पवार व त्याच्या पत्नीविरुद्ध दोन वर्षांपूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांनी १६ लोकांची अडिच कोटी रुपयांनी फसवणुक केल्याचा आरोप होता.
उपचार होत नसल्याची खंत
पवार यांनी वैद्यकीय जामिनासाठी अर्ज करताना त्यात मधुमेह, फुप्फुस तसेच मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असल्याचे म्हटले होते. शिवाय जे. जे. रुग्णालयात आणि त्यापूर्वी कारागृह रुग्णालयात योग्य उपचार न झाल्याने ३० एप्रिल रोजी पाय कापावा लागल्याचा आरोपही पवार यांनी जामिनाच्या अर्जात केला होता.
तपास अधिकारीच आजारी
अर्जावरील सुनावणी ६ मे रोजी निश्चित करण्यात आली होती. परंतु, तपास अधिकारी आजारपणाच्या सुट्टीवर असल्याने पोलिसांनी अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. शिवाय पवार यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ९ मे रोजी पवार यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावर अखेर सुनावणी पूर्ण झाली.
अडथळे येत गेले
पवार यांची प्रकृती चिंताजनक असून, कारागृहाच्या वातावरणात ते जिवंत राहू शकणार नसल्याचे त्यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. मात्र, प्रकरणातील मूळ तक्रारदाराने हस्तक्षेप अर्जाद्वारे पवार यांच्या वैद्यकीय जामीन अर्जाला विरोध केला. न्यायालयाने पवार याच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला. मात्र, अन्य प्रकरणांत व्यग्र असल्याने न्यायालयाने पवार यांच्या अर्जावर ११ मे रोजी निर्णय देऊन त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर केला. परंतु, त्याच्या दोन दिवस आधीच पवार याचा जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला.
Mumbai Court Medical Bail Suspect Death