मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – न्यायालयात बाजू कशी मांडली जाते, यावरही बरेचदा निर्णयाचा कल अवलंबून असतो. कधीकधी चुकीच्या व्यक्तीला न्याय मिळतो कारण योग्य व्यक्ती आपली बाजू मांडण्यात कमी पडते, तर कधीकधी चुकीच्या व्यक्तीला त्याच्या हलगर्जीपणाचाही मोठा फटका सहन करावा लागतो. न्यायालयाच्या अशाच एका निर्णयाची सध्या जोरदार चर्चा आहे.
एका घटस्फोटित महिलेने पतीकडून पोटगीची मागणी केली. तिने महिन्याचा हिशेब न्यायालयात सादर केला. या अर्जात एकूण ७० हजार रुपये महिना पोटगी देण्याची मागणी महिलेने केली आहे. पतीने हिशे बघितला तेव्हा त्याचे डोळेच विस्फारले. कारण या खर्चात महिलेकडे असलेल्या तीन कुत्र्यांच्या मासिक खर्चाचे पैसेही जोडले आणि पोटगीपोटी महिन्याला ७० हजार रुपये मिळावे, अशी मागणी केली.
या याचिकेवर मुंबईतील महानगर दंडाधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली. या ५५ वर्षीय महिलेने तिच्याकडे असलेल्या रॉटलवेअर्स जातीच्या तीन कुत्र्यांच्या देखभालीचा आणि स्वतःचा असा एकूण ७० हजार रुपये महिना मिळावा, अशी याचिकेद्वारे मागणी केली. पण या पोटगीत कपात करण्याची विनंती पतीच्या बाजुने करण्यात आली. व्यवसायात तोटा होत असल्याने एवढी रक्कम देणे शक्य नाही, असे पतीने आपली बाजू मांडताना सांगितले. त्यावर न्यायालयाने हा युक्तिवादच फेटाळून लावला.
तसेच व्यवसायात तोटा होत असल्याचा कुठलाही पुरावा आपल्याकडून सादर करण्यात आलेला नाही किंवा जे पुरावे आहेत त्यावरून व्यवसायात तोटा होत असल्याचे सिद्धही होत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. तसेच याचिकेचा निकाल लागत नाही तोपर्यंत महिन्याकाठी पोटगी म्हणून ५० हजार रुपये द्यावे, असे आदेश पतीला दिले.
पोकळी भरून काढतील
तुटलेल्या नात्यांमुळे निर्माण होणारी भावनिक पोकळी श्वान भरून काढतात. ते सुद्धा सुसंस्कृत जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहेत. पाळीव प्राण्यांमुळे माणसाला निरोगी जीवन जगणे शक्य होते, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने पतीला ५० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. १९८६मध्ये या जोडप्याचे लग्न झाले व २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोन्ही मुली परदेशी स्थायिक आहेत.