मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सेन्सेक्स-निफ्टी बुधवारी नवीन सार्वकालिक उच्चांकी शिखर पातळी सर केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स परिणामी १९५.४५ अंशांनी (०.३१ टक्के) वाढून ६३,५२३.१५ या विक्रमी पातळीवर स्थिरावला. यामुळे ग्राहकांना फायदा होणार हे निश्चित आहे. पण, व्याजदरातील अनिश्चितता, जागतिक आर्थिक मंदी आणि चलनवाढीच्या समस्यांसारख्या अधूनमधून येणार्या अडथळ्यांसाठी त्यांना सज्ज राहावे लागेल.
गेल्या आठवड्यात नोंदविण्यात आलेल्या ६३,३८४.५८ या सार्वकालिक उच्चांकी बंद स्तराला यंदा मागे टाकले. बुधवारी दिवसभरात सेन्सेक्स २६०.६१ अंशांनी उसळून ६३,५८८.३१ या दिवसांतर्गंत ऐेतिहासिक शिखर पातळीवर पोहोचला. या साऱ्यांत गुंतवणुकदारांना लाभ होणार आहे, हे निश्चित. पण गुंतवणूकदारांसाठी आणखी एक मोठी चिंतेची बाब म्हणजे मान्सूनची निराशाजनक कामगिरी आहे. ज्यामध्ये १५ जूनपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक कमतरता दिसून आली आहे. याशिवाय चीन आणि इतर अर्थव्यवस्थांकडून मंदावलेली मागणी पाहता कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण यांसारखे इतर नकारात्मक परिणाम गुंतवणूकदारांना पुढे जाण्यास त्रासदायक ठरू शकतात.
भारतात किरकोळ चलनवाढीचा दर पुन्हा वाढला तर आरबीआयला दरवाढीसह पुन्हा महत्त्वाची पावले उचलावी लागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १ डिसेंबर रोजी सेन्सेक्सने नोंदविलेला ६३,५८३.०७ हा दिवसांतर्गंत विक्रमी उच्चांक मोडला गेला आहे. युनायटेड स्टेट्स, युरोझोन, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवानमधील बहुतेक बाजारपेठांसह भारतीय शेअर बाजारही जागतिक यादीत सामील झाला आहे, हे विशेष.
गुंतवणूकदारांच्या विश्वासामुळे
यावर्षी एप्रिलपासून भारतीय बाजारांमध्ये विदेशी संस्थागत गुंतवणूकदार अर्थात एफआयआयचे पुनरागमन झाले. त्यांच्यासह देशांतर्गत गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजारावर विश्वास ठेवून अविरत सुरू ठेवलेल्या खरेदी पाठबळाने निर्देशांकांना नवनवीन शिखर गाठता आले. देशांतर्गत अर्थव्यवस्थेत वाढीचे संकेत देणारे प्रमुख निदर्शक तसेच सरकारच्या भांडवली खर्चात सतत वाढीने बाजारातील सकारात्मक वातावरणाला हातभार लावला, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.