मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महानगरी मुंबई हे गतिमान शहर मानले जाते. येथे कोणीही कोणाला देऊ वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे कोणाच्या घरात काय चालले , याचा कोणालाही पत्ता नसतो. प्रत्येक जण आपापल्या दैनंदिन जीवनाच्या धावपळीत कामात नोकरी काम आणि व्यवसायात मग्न असतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची परवड होते. अलीकडच्या काळात ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करावी म्हणून पोलीस पथके देखील तयार करण्यात आली आहेत. परंतु तरीही एखाद्या घरात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तरी लवकर कळत नाही. मुंबईतील अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मुलगी व जावई परदेशात, घरात केवळ वृद्ध पती-पत्नी होते, पत्नीचा मृत्यू झाला, मात्र निराधार पती काहीही करू शकले नाहीत, अखेर पोलीस आल्यावर सर्व कळाले.
मृतदेहासोबत अख्खी रात्र काढली
पत्नीचा मृत्यू होऊन ती जवळच पडलेली होती, तरी हतबल पती काहीही करू शकला नाही. पोलीस आले तेव्हा, सर्व प्रकार उघडकीस आला. असहाय्यपणे ते पत्नीच्या मृतदेहाशेजारी अंथरुणावर पडून राहिले. शेजाऱ्यांना घरातून उग्र वास येऊ लागला तेव्हा पोलिसांना बोलावून दार उघडले. आतील दृश्य सगळ्यांनी पाहिले तेव्हा प्रत्येकाचे हृदय हेलावून गेले. बोरिवलीतील राजेंद्रनगरमधील एका इमारतीत हा हृदयद्रावक प्रकार उघडकीस आला. कायम अंथरुणाला खिळून असलेले ८० वर्ष वयाचे भास्कर शेट्टी हे त्यांच्या सर्व घर सांभाळणाऱ्या व सगळ्यांशी आपुलकीचे संबंध ठेवणाऱ्या ७८ वर्ष वयाच्या त्यांच्या पत्नी सुलोचना शेट्टी यांच्या बरोबर राहतात. त्यांची मुलगी रेश्मा आणि जावई बिरेन हे अमेरिकेत राहतात.
पोलिसांनी दरवाजा तोडला
आपल्या वृद्ध आई-वडिलांसाठी त्यांनी घरी केअरटेकर ठेवलेला. मात्र, तो नीट काळजी घेत नाही म्हणून काही दिवसांपूर्वी त्याला काढून टाकले होते. मुंबईत ज्येष्ठ नागरिकांना जी काही मदत लागेल ते देण्याचे काम पोलिस करतात. दर सात दिवसांनी ते एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेट देतात. पोलिस ठाण्याचे कर्मचारी शेट्टी दाम्पत्याच्या घरी जाऊन आले होते. त्यावेळी दोघेही व्यवस्थित होते. मात्र पावसाळा असल्यामुळे सुलोचनाबाई सोसायटीत खाली आल्या नसतील, असे वाटल्याने कोणी फारशी विचारपूस केली नाही. मात्र, दोन दिवसांनंतर घरातून चाहूल येईनाशी झाली. उग्र वास येऊ लागला, तेव्हा पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडला, तेव्हा समोरचे चित्र पाषाण हृदयालाही पाझर फोडणारे होते. निश्चेष्ट पडलेला सुलोचनाबाईंचा देह आणि विमनस्क अवस्थेत बाजूला त्यांचे पती… काळजाचे पाणी पाणी व्हावे, असे दृश्य पाहून पोलिसांच्याही डोळ्यालाही धारा लागल्या होत्या.
शेजारी पाजारी गहिवरले
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अनिल आव्हाड यांनी सांगितले की, सुलोचना शेट्टी कमालीच्या उत्साही होत्या. नवरात्र असो की गणपती, सोसायटीच्या कार्यक्रमात भाग घ्यायच्या. आपल्या आजारी ८० वर्षीय पतीची आपुलकीने काळजीही घ्यायच्या. आम्ही एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकडे सतत जात असतो. शेट्टी दाम्पत्यांच्या घरी आमचे कर्मचारी गेले होते. त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. शवविच्छेदन अहवालात कोणतीही संशयास्पद बाब आढळलेली नाही. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, ही घटना कळताच मुलगी आणि जावई मुंबईत आले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगी आणि जावई या सगळ्या प्रकारानंतर नि:शब्द झाले होते. तर या प्रकारामुळे शेजारी पाजारी गहिवरले आपण आपल्याच आयुष्यात किती बिझी होऊन जातो याचे भान राहत नाही अशी भावना शेजारी असलेल्या एका महिलेने व्यक्त केली.
mumbai borivali old husband wife death home
Aged Senior Citizens alone