मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई महापालिकेच्या कथित कोविड घोटाळ्यांतर्गत दररोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. हा घोटाळा कोट्यवधीचा असून यामध्ये शेकडो डॉक्टरांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईतील कोविड सेंटर घोटाळ्याने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे शोधता शोधता तपास यंत्रणांनाही घाम फुटला आहे.
काही दिवसांपूर्वीच ईडीनेदेखील या प्रकरणी मुंबई महापालिकेच्या कागदपत्रांची शहानिशा केली होती. त्यातून आता २०० हून अधिक डॉक्टरांच्या नावाचा वापर करून पालिकेकडून कोट्यवधी रुपये लाटल्याचे तपासात उघड झाले आहे. बहुतांश डॉक्टरांनी काही दिवस, तर काहींनी काही आठवडे या कोविड सेंटरमध्ये सेवा दिली होती. मात्र त्यांनी कित्येक महिने सेवा दिल्याच्या खोट्या नोंदी करून त्यांच्या नावाने कोट्यवधी रुपये उकळल्याची माहितीही समोर आली आहे. ईडीने ई-मेलद्वारे संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला असून, या प्रकरणात डॉक्टरांना ईडी साक्षीदार करणार असल्याचेही कळते.
कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात ईडीने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या भागीदारांना समन्स बजावले आहे. २६ ते २८ जून या काळात ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. भागीदार डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनलाल शहा आणि राजू नंदकुमार साळुंखे यांना हे समन्स बजावले आहे. तसेच या प्रकरणात मुंबई महापालिकेच्या ९ अधिकाऱ्यांचेही जबाब नोंदवण्यात येणार आहे.
जयस्वाल यांना दुसरे समन्स?
कोविड सेंटर घोटाळ्यात आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांचेदेखील नाव पुढे आले आहे. जयस्वाल यांच्या निवासस्थानावरही छापेमारी करण्यात आली होती. आता जयस्वाल यांनी ईडीकडे चार दिवसांचा वेळ मागितला आहे. या प्रकरणात चौकशीसाठी ईडीने काल, गुरुवारी जयस्वाल यांना समन्स बजावले होते. जयस्वाल हे काल ईडीसमोर हजर झाले नाहीत. ईडी लवकरच त्यांना दुसरे समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.