मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पालकमंत्री दालनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की मुंबईतील पालकमंत्री कार्यालय हे जनतेसाठी कार्यरत राहणार आहे. आम्ही महापालिकेच्या कार्यालयात बसून, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, या निर्णयाला आदित्य ठाकरे आणि जयंत पाटील यांनी तीव्र विरोध केला आहे.
मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री या नात्याने आपण मुंबईत फिरलो, तसेच ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने काम केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी पालकमंत्री म्हणून आपण मुंबई उपनगरातील सर्व 15 वार्डमध्ये फिरलो. यावेळी 15 हजारपेक्षा अधिक नागरिकांच्या समस्या प्राप्त झाल्या, त्यातील 3 हजारपेक्षा अधिक समस्यांचे जागीच समाधान देखील केले! त्यातून जनतेच्या हक्काच्या या कक्षाची आवश्यकता अधोरेखित होते. याठिकाणी नागरिकांच्या अनेक समस्या मुख्य कार्यालयाशी निगडीत असल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे मुंबई उपनगरचा पालकमंत्री या नात्याने, विविध बैठकीसाठी अधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलवावे लागते. हे सर्व सुकर व्हावे, या हेतूने मुंबई महापालिका कार्यालयात पालकमंत्र्यांचे दालन सुरू करण्यात आल्याचेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात जाऊन पालकमंत्री श्री. लोढा यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीची पाहणी केली. मुंबई मध्ये होणाऱ्या पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांना होणार त्रास कमी करण्यासाठीची दक्षता प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले
आता तर थेट मुंबई महापालिकेत मुख्यालयातच अतिक्रमण सुरु झाले आहे. कदाचित ह्याला “Casa BMC” सारखं काहितरी बिल्डरच्या जाहिरातीसारखं नावही देतील. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून BMC च्या स्वातंत्र्यावर हा निर्लज्ज हल्ला आहे. आणि जर हे परवानगी घेऊन झालं असेल तर मुंबईतील आमदार ह्या नात्याने आम्हा प्रत्येकाला तिथे केबिन मिळावी आणि महापौरांना मंत्रालयात केबिन द्यावी. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत बिल्डर कंत्राटदारांच्या खोके सरकारला बीएमसीमध्ये बेकायदेशीरपणे कार्यालय का हवे आहे?
जयंत पाटील म्हणाले
मुंबई महानगरपालिकेचा कारभार स्वतंत्र असताना देखील मुंबईचे पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मनपामध्ये स्वतःचे कार्यालय उभे केले आहे. मीही या मुंबई शहराचा पालकमंत्री राहिलो आहे. अशापद्धतीने मनपामध्ये पालकमंत्र्यांनी कार्यालय स्थापन करणे म्हणजे मनपाच्या अधिकारात हस्तक्षेप करणे झाले, मनपाच्या कारभारात ढवळाढवळ करणे झाले. मनपामध्ये लोकनियुक्त बॉडी नसताना शासनाच्या लोकांनी त्यापासून लांब राहिलेले बरे नाहीतर चुकीची प्रथा सुरू होईल.