ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आधुनिक विचाराधारा मानणार्या २१ व्या शतकात माणूस हा भगत, बुवाबाजी यात गुरफटला जातो, जारण मारण,करणी भूतबाधा, मंत्र शक्ती काळी जादू हे प्रकार आजही खेड्यापाड्यात आढळतात, इतकेच नव्हे तर मुंबईसारख्या महानगरात अनेक ठिकाणी या प्रकारावर लोक विश्वास ठेवतात, तसेच रेल्वे आणि लोकलमध्ये देखील या संदर्भातील जाहिराती खुलेआम लावलेल्या दिसून येतात, आणि त्या ठिकाणी असलेल्या फोन नंबर किंवा संपर्क साधून लोक आपल्या समस्या घेऊन या भोंदूबाबांकडे जातात. अंधश्रद्धा आजही लोकांच्या मेंदूमध्ये इतक्या घट्टपणे घुसून बसल्या आहेत की, तिथे विवेक आपोआप गहाण पडतो. याचेच एक उदाहरण उघडकीस आले आहे. अडीअडचणी दूर करण्याचे प्रलोभन दाखवून एका मांत्रिकाने एका विवाहितेवर ४ वर्ष वारंवार बलात्कार केला. हा गैरप्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मैत्रिणीमुळे ओळख
याबाबत पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, आपल्या मैत्रिणीच्या माध्यमातून विवाहीत महिलेची सुमारे ५ वर्षांपूर्वी ओळख झाली. तेव्हा मैत्रिणीने सांगितले की, ‘कथीतबाबा हा काळी जादू करत असून सर्व समस्या दूर करतो, माझ्या सर्व समस्या दूर होऊन माझी भरभराट झाली आहे, त्यामुळे तुलाही तो मदत करेल. ‘ खरे म्हणजे घरगुती अडचणीमुळे ही महिला आधीच त्रस्त झाली होती, त्यातच पीडित विवाहितेचे पतीशी पटत नव्हते, तसेच तिचा लग्नाआधीचा प्रियकरही तिला त्रास देत असे. त्यामुळे मैत्रिणीच्या सांगण्याप्रमाणे तिने मांत्रिक मुकेश दर्जी (वय ४५) याच्याशी संपर्क साधला.
मांत्रिकाला अटक
जादूच्या साह्याने साऱ्या समस्या दूर करेल; मात्र त्यासाठी तुला माझ्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील, असे दर्जीने सांगितले. आणि इथेच ही महिला त्या प्रकाराला बळी पडली. त्यानंतर तो भोंदूबाबा गेली चार वर्षे काळ्या जादूच्या नावाखाली त्या महिलेवर लैंगिक अत्याचार करत होता. अखेर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी मांत्रिकावर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.