मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
बेस्ट वाहतूक कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. लोढा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल उपस्थित होते.
यावेळी लोढा म्हणाले की, मुंबईतील बेस्टमध्ये भाडेतत्वावर कंत्राटी बसेसच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील त्यांच्या मागण्या लक्षात घेण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात भाडेतत्वावरील बसेसच्या मालकांसह दोन वेळा बैठक घेण्यात आली असून, कामगारांच्या मागण्यांची कायदेशीर पूर्तता व्हावी असे सरकारतर्फे बसेसच्या मालकांना सांगण्यात आले आहे. या आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारकडून बेस्टच्या ताफ्यात 3052 बसेस पैकी 2651 बसेस विविध पद्धतीने नागरिकांच्या सेवेत कार्यरत आहेत. सध्या 400 बसेसचा तुटवडा असून, तो भरून काढण्यात येईल व त्या बसेसची सेवा येत्या 24 ते 48 तासात पूर्ववत होईल!
मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले की, मुंबईत ३०५२ बस नागरिकांच्या सेवेसाठी आहेत. त्यापैकी १,३८१ बस बेस्टच्या असून त्या सुरू आहेत. खासगी कंपन्यांद्वारे उर्वरित १,६७१ बस (वेट लीजवर) कंत्राटी पद्धतीने चालविण्यात येतात. जास्तीत जास्त बस उपलब्ध व्हाव्यात यासाठी बेस्टकडून ९०० वाहनचालक दिले आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहनने (एमएसआरटीसीने) १८० पेक्षा अधिक बस दिल्या आहेत. तसेच, २०० पेक्षा जास्त खासगी बस सुरू करण्यात आल्या आहेत. अशा एकूण ३०५२ बसपैकी २६५१ बस नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्यक्षात सुरू असून, उर्वरित ४०० बस तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे.
खासगी कंपन्यानी बस वाहन चालकांच्या किमान वेतनाची शाश्वती द्यावी, त्यांना आवश्यक सोयी सुविधा द्याव्यात, दिवाळी बोनस संदर्भातील प्रश्न सोडविण्यासंदर्भात कंपन्यांच्या मालकांसोबत चर्चा करण्यात आली असल्याचेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.
mumbai best bus contractual employee strike minister mangal prabhat lodha