इंडिया दर्पण वृत्तसेवा – पाकिस्तानने पुन्हा एकदा समुद्रातून घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. गुजरातमधील सर क्रीक परिसरात बुधवारी रात्री उशिरा ११ पाकिस्तानी बोटी सापडल्या आहेत. बीएसएफकडून या जहाजावर असलेल्या संशयित पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. मुंबई हल्ल्याप्रमाणेच नवा कट रचण्यात आला होता की काय, याचा सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
हरामी–नाला या परिसरात पाकिस्तानी बोटींची घुसखोरी झाल्याची बातमी आली होती. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा बीएसएफने शोध मोहीम सुरू करून पाकिस्तानी मच्छिमारांच्या ११ बोटी ताब्यात घेतल्या. मात्र या बोटींमध्ये एकही मच्छीमार आढळून आला नाही. पकडले जाण्याच्या भीतीने हे मच्छिमार आजूबाजूच्या परिसरात लपले असल्याचा बीएसएफला संशय आहे. त्यांच्या अटकेसाठीच कमांडो कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानी सीमेला लागून असलेल्या सर क्रीक परिसरात अनेकदा पाकिस्तानी बोटी येतात. मात्र या मच्छिमारांच्या वेशात पाकिस्तानी तस्कर आणि दहशतवादीही घुसखोरीचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे याप्रकरणी योग्य ती काळजी घेतली जात आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय हवाई दलाच्या कमांडोनाही त्यांच्या शोधासाठी परिसरात हवाईदल सोडण्यात आले आहे. बीएसएफने सांगितले की, आयएएफ हेलिकॉप्टरच्या मदतीने कमांडोच्या तीन गटांना सर क्रीक भागातील तीन वेगवेगळ्या भागात हवाई पाठवण्यात आले आहे. ३०० चौरस किलोमीटर परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे. बीएसएफला संशय आहे की संशयित पाकिस्तानी मच्छीमार सिर क्रीक परिसरातील टायटल – वॉटर, दलदल आणि खारफुटीच्या जंगलात लपले असावेत. याबरोबरच शेजारील इतर कोणत्या देशांमधून काही बोटी भारतीय हद्दीत घुसल्या आहेत का, याचा शोधही बीएसएफकडून घेतला जात आहे.