मुंबई – काही वेळा कुंपणच शेत खाते, असे म्हटले जाते. तसेच पोलिस हे जनतेचे रक्षक असल्याचे सांगण्यात येते. परंतु एखाद्या भ्रष्ट आणि नालायक अधिकार्यामुळे संपूर्ण पोलिस खाते बदनाम होते, अशीच एक घटना मुंबई शहरात घडली. आपल्याच खात्यातील महिला सहकारी अधिकाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून सहायक पोलीस निरीक्षकाने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. घटनेमुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
संबंधित महिला पाेलीस उपनिरीक्षकाने या प्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप शिवाजी पिसे असे त्या संशयिताचे नाव असून ते कफ परेड पोलीस ठाण्यात एपीआय म्हणून कार्यरत आहेत.
गेल्या ८ वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवल्यानंतर गेल्या महिन्यात त्याने अन्य तरुणीशी विवाह केल्याने महिला पाेलीस उपनिरीक्षकाने (पीएसआय ) आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याची तक्रार पाेलिसांत दाखल केली आहे. त्यानुसार पाेलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ते अधिक चाैकशी करत आहेत.
संशयीत संदीप पिसे व त्या महिलेचे प्रेमसंबंध होते, त्यातून शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. दरम्यानच्या काळात त्या महिला उपनिरीक्षकाची पुण्याला बदली झाली. तर पिसे याची पदोन्नती झाल्याने दाेेघेही वेगवेगळ्या ठिकाणी गेले. मात्र प्रेमसंबंध असल्याने ती फोन करून त्याच्याकडे वारंवार लग्नाची विचारणा करत हाेती. मात्र याबाबत निर्णय घेण्यात तो टाळाटाळ करीत होता.
अखेर गेल्या महिन्यात त्याने अन्य तरुणीशी विवाह केला. त्याबाबतची माहिती या महिला पाेलीस उपनिरीक्षकाला मिळाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पिसेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.