मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लिफ्टमध्ये बिघाड झाल्यामुळे एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबई येथे घडली आहे. या प्रकरणी सोसायटीचे सचिव, खजिनदार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुद्र बर्हाटे असं मृत मुलाचे नाव आहे.
प्राप्त माहितनुसार, ही घटना मागील महिन्यात ७ जून रोजी घडली होती. या पाच जणांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, आरोपींच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे पुरावे मिळविण्यासाठी आम्ही चौकशी करत असल्याने एफआयआर नोंदवायला आम्हाला एक महिना लागला.
याप्रकरणी रुद्रची आई प्रियांका बऱ्हाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या लल्लूभाई कंपाऊंडमधील सुप्रभात हाऊसिंग सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर पती, चार मुले आणि मेव्हणा प्रशांतसोबत राहत राहत होत्या. रहिवाशांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर अनेकदा लिफ्टच्या नादुरुस्तीची तक्रार करूनही या प्रकरणी गृहनिर्माण संस्थेने कोणतीही तक्रार नोंदवली नसल्याचे त्यांनी सांगितले.
लिफ्ट बंद ठेवण्याची विनंती
६ जून रोजी त्यांचा मेहुणा कामावरून परतत असताना त्यांना लिफ्ट बंद असल्याचे दिसले. त्यावेळी कोषाध्यक्षांच्या उपस्थितीत एक तंत्रज्ञ लिफ्टची दुरुस्ती करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं. यानंतर प्रशांतने कोषाध्यक्षांना लिफ्ट पूर्णपणे दुरुस्त होईपर्यंत बंद ठेवा, असे सांगितले.
बेशुद्ध पडलेला आढळला
याबद्दल सांगतांना त्या म्हणाल्या आहेत की, इमारतीची लिफ्ट अनेकदा बंद पडली होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी रुद्रला इमारतीजवळील दुकानातून काहीतरी खरेदी करण्यासाठी पाठवले. थोड्या वेळाने सातव्या मजल्याजवळ गर्दी जमल्याचे त्याने पाहिले. त्या घटनास्थळी पोहोचल्या तेव्हा त्यांना रुद्र जमिनीवर बेशुद्ध पडलेला दिसला. त्यांनी रुद्रला लिफ्टच्या गॅपमधून बाहेर काढल्याचे तेथे उपस्थित लोकांनी सांगितले. त्यानंतर त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.