मुंबई नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालकाला मुंबई एसीबीने ५ लाखांची लाच घेताना अटक केली आहे. याच प्रकरणात मुंबई एसीबीने या सहसंचालकाच्या नाशकातील मालमत्तांचीही झडती घेतली. या झडतीत तब्बल दीड कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या कौशल्य प्रशिक्षण मंत्रालयाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग आहे. याच विभागाअंतर्गत नवीन अभ्यासक्रमांना मंजुरी दिली जाते. असाच एक प्रस्ताव आला असताना सहसंचालक जाधव यांनी ५ लाखांची मागणी केली. त्यानंतर जाधव हे ही लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. त्यानंतर एसीबीने जाधव यांच्या मुंबईतील मालमत्तांचा शोध घेतला. त्यात हे लक्षात आले की जाधव यांची नाशकातही बरीच मालमत्ता आहे. एसीबीच्या पथकाने नाशकात झडती घेतली. त्यात जवळपास दीड कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.