मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन प्रवाशांकडे तब्बल १८ कोटी रुपयांचे कोकेन सापडले आहे. त्यामुळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांनी हे कोकेन कुठून आणले आणि ते कुणाला विक्री करणार होते, याचे मोठे रॅकेट लवकरच उघड होण्याची चिन्हे आहेत.
इथिओपिअन एअरलाईन्सचे विमान ईटी-640 ने प्रवास करून दोन प्रवासी अडीस अबाबा इथून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. त्यांना मली पदार्थाची वाहतूक केल्याबद्दल ताब्यात घेतले. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या मुंबई विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रवाशांकडे असलेल्या चार रिकाम्या बॅगा फाडून तपासल्या असता प्रत्येक बॅगेतून पांढरी पूड भरलेल्या दोन अशा एकून आठ प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्या. तपासणीअंती ही पूड कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. 1985 च्या अंमलीपदार्थ कायद्यानुसार कोकेनवर बंदी आहे.
हे दोन्ही प्रवासी परदेशी नागरीक असून त्यांतील 27 वर्षीय पुरुष केनियाचा नागरीक आहे व 30 वर्षीय महिला गिनीची नागरीक आहे. पुरुष प्रवासी विदूषक म्हणून काम करतो व महिला प्रवासी महिलांसाठीच्या कपडे उद्योगात कार्यरत आहे. या दोघांकडे कोकेनची 1794 ग्रॅम पूड मिळाली असून त्याची काळ्या बाजारात किंमत जवळपास 18 कोटी रुपये इतकी आहे. भारतातील संभाव्य गिऱ्हाईकांबाबत त्यांची चौकशी सुरू आहे.
Mumbai Airport Crime 18 Crore Cocaine Seized