इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी १.१८ किलो कोकेन आणि ४८५ ग्रॅम सोन्याची भुकटी केली जप्त.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआय), मुंबई, क्षेत्र-III येथील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दोन व पाच मार्च या कालावधीत दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अवैध बाजारपेठेतील किंमत अंदाजे ११.८ कोटी रुपये असलेले १.१८ किलोग्रॅम वजनाचे संशयित कोकेन आणि सुमारे ४० लाख रुपये किंमतीची ४८५ ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त केली.
११.८ कोटी रुपयाचे कोकेन
२ मार्च रोजी, संशयास्पद हालचाली वाटल्याने, युगांडा एअरलाइन्सच्या यूआर 430 या विमानाने युगांडाहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला आगमन कक्षात रोखण्यात आले. त्याच्या प्रवासाचा तपशील आणि मुंबईला भेट देण्याचा उद्देश याबाबत चौकशी करताना, तो प्रवासी अस्वस्थ जाणवला. पुढील चौकशीनंतर, त्याने पांढऱ्या रंगाच्या चुरायुक्त कॅप्सूल सेवन केल्याचे कबूल केले, जे अंमली पदार्थ असल्याचा संशय आल्याने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्याची विनंती माननीय न्यायदंडाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. पुढील तीन दिवसांत, प्रवाशाच्या शरीरातून एकूण १.१८ किलोग्रॅम वजनाच्या १०० कॅप्सूल काढण्यात आल्या. हे पदार्थ कोकेन असल्याचे निष्पन्न झाले, ज्याची अवैध बाजारपेठेतील किंमत अंदाजे ११.८ कोटी रुपये आहे. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, १९८५ च्या तरतुदींनुसार कारवाई सुरू करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सोन्याच्या भुकटीची तस्करी
३ मार्च रोजी, विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, एका ९३ वर्षीय प्रवाशाला अटक करण्यात आली. तो सुमारे ४० लाख रुपये किंमतीच्या ४८५ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या भुकटीची तस्करी करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. प्रवाशाने परिधान केलेल्या कपड्यांमध्ये सोने लपवले होते. सीमाशुल्क कायदा, १९६२च्या तरतुदींनुसार हे सोने जप्त करण्यात आले. सीमाशुल्क विभाग, अवैध तस्करी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा राखण्यासाठी कटिबद्ध आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सध्या सुरू आहे.