मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMI) सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी १,०२२ किलो कोकेन/मेथाक्वॉलोन जप्त केले असून, बेकायदेशीर बाजारात त्याचे मूल्य अंदाजे १०.२२ कोटी रुपये आहे. या कारवाईप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
१६ फेब्रुवारी रोजी, युगांडन एअरलाइन्सच्या फ्लाइट क्र. UR 430 मधून युगांडातील एंटेबे येथून आलेल्या प्रवाशाला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी थांबवले. त्याच्या चौकशीत त्याला प्रवासाचे तपशील तसेच त्याच्या मुंबई भेटीचा उद्देश याविषयी त्यांनी विचारणा केली असता, प्रवासी अस्वस्थ झाल्याचे दिसले. अधिक तपासाअंती, प्रवाशाने आपण पांढरा चुरासदृष्य पदार्थ असलेल्या कॅप्सूल्स शरीरात दडवून आणल्याचे कबूल केले, हा पदार्थ नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायदा, १९८५ नुसार अंमली पदार्थ असल्याचा संशय आहे.
त्याने दिलेल्या कबुलीनंतर, प्रवाशाला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आले असता त्यांनी वैद्यकीय देखरेखीखाली संबंधित पदार्थ हस्तगत करण्याचे आदेश दिले. पुढील तीन दिवसांत, प्रवाशाने ८४ कॅप्सूल बाहेर काढल्या, त्यामध्ये एकूण १,०२२ किलो पांढरा चुरासदृष्य पदार्थ आढळला, तो कोकेन किंवा मेथाक्वालोन असल्याचा संशय आहे. एनडीपीएस कायदा, १९८५ च्या तरतुदींनुसार प्रवाशाला अटक करण्यात आली असून आणखी चौकशी सुरू आहे.