पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवाडे वणी येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीवरील ३ तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे तिघे तरुण शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत. या दुर्घटनेमुळे शिरवाडे वणी गावावर शोककळा पसरली आहे. सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त शिरवाडे ग्रामस्थांमध्ये आज सकाळपासून महामार्गावर आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे गेल्या अर्ध्या तासापासून महामार्ग ठप्प झाला आहे. या आंदोलनाची दखल घेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या आंदोलनस्थळी दाखल झाल्या आहेत.
डॉ. भारती पवार यांच्याकडून आंदोलकांची समजूत काढली जात आहे. मात्र, महामार्गावर उड्डाणपूल नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत. त्यामुळे गावातील अनेक तरुणांचा बळी गेला आहे. यापुढे आता आम्ही हे सहन करणार नाही, असा इशारा देत ग्रामस्थांनी महामार्गावर ठिय्या मांडला आहे. डॉ. पवार आंदोलनस्थळी आल्याने तहसिलदार, पोलिस निरीक्षक यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारीही तेथए हजर झाले आहेत. तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारीही तेथे उपस्थित झाले आहेत. येथे उड्डाणपुल करण्यासंदर्भात डॉ. पवार यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच, डॉ. पवार यांनी थेट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही मोबाईलद्वारे संपर्क साधला. याठिकाणी उड्डाणपूल आणि अन्य सुरक्षा उपाययोजना करण्यात येतील, असे डॉ. पवार यांनी सांगितले आहे. मात्र, अद्यापही रास्ता रोको सुरू आहे.
तिघा शिवसैनिकांचा मृत्यू
सुभाष निफाडे, नितीन निफाडे आणि महेश निफाडे अशी मृत तरुणांची नावे आहेत. यातील सुभाष निफाडे हे निफाड तालुका उपप्रमुख आहेत. हे तिघे जण कामानिमित्त पिंपळगाव बसवंत येथे गेले होते. त्यांचे काम आटोपून रात्रीच्या सुमारास ते शिरवाडे वणी गावाकडे मुंबई-आग्रा महामार्गाने जात होते. त्याचवेळी चांदवडकडून भरधाव वेगाने येणाऱ्या बसने निफाडे या तरुणांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत तिघा तरुणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघा तरुणांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, शिरवाडे ववणी फाट्यावर सतत अपघात होत असतात. गेल्या काही वर्षात ७५ जणांचा बळी येथे गेला आहे. याठिकाणी उड्डाणपुलाची मागणी असली तरी त्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने शिरवाडे वणी ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आताच्या अपघातामुळे गावातील तीन तरुण ठार झाले आहेत. हे तिघेही जण सामाजिक कार्यात अग्रेसर होते. सोमवारी दुपारी त्यांनी शांतता समितीच्या बैठकीत सहभाग घेतला. तसेच, विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यात ते अग्रेसर होते. त्यांच्या निधनामुळे गावाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. आज शोकाकुल वातावरणात या तिघा तरुणांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.