मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुप विक्रेत्यावर कारवाई केली आहे. दक्षता विभागास प्राप्त माहितीच्या अनुषंगाने मस्जिद बंदर मधील .मे. ऋषभ शुद्ध घी भांडार गोडाऊन, पहिला मजला, १५, श्रीनाथजी बिल्डिंग, केशवजी नाईक रोड, चिंचबंदर, मुंबई-9, येथील तीन तुपाचे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तर, उर्वरित ४०० किलो, किंमत रु. २ लाख ९९ हजार ९० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
हे अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, विश्लेषण अहवालाच्या अनुषंगाने पुढील आवश्यक कारवाई केली जाईल. दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुरक्षित, आरोग्यदायी व सकस अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत याकरिता प्रशासनाने अन्न आस्थापनाच्या तपासण्या व अन्न नमुने तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.
Mumbai Adulterated Ghee FDA Action