मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेले दोन ते तीन वर्ष भारतात कोरोनाचा कहर होता, तो या वर्षाच्या प्रारंभी कमी झाला पण आता अचानकपणे गोवरचा प्रकोप पाहायला मिळत आहे. विशेषतः मुंबईत त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढलेला दिसून येतो. गेल्या ४८ तासांमध्ये ३ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे तिघे एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. त्यानंतर गोवर आजारामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
विशेष म्हणजे गोवर आजारावर ठोस उपचार नाहीत. त्यामुळे या आजाराची लक्षणे जाणून घेणे गरजेचे आहे जेणेकरून वेळीच वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकते. यात डोळे खूप लाल होणे, सर्दी, बारीक ताप, खोकला तसेच तोंडावर, गालावर लालसर ठिपके येतात व पुरळ येते. हे ठिपके म्हणजेच गोवर ओळखण्याचे हमखास लक्षणे आहे. तसेच ताप हळू हळू वाढत जातो व पूर्ण अंगभर कानाच्यामागे चेहरा, मान, छाती, पोट याप्रमाणे पुरळ येते व शेवटी हातापायावर पसरते पण कधीकधी पुरळ हातापायावर यायच्या आधीच गोवर कमी होतो. गोवराचे पुरळ ज्याप्रमाणे येते. त्याचप्रमाणे म्हणजे वरून खाली नाहीसे होते. तोंडातील पुरळामुळे भूक मंदावते. खोकला मात्र थोडे दिवस टिकतो. ताप उतरून नंतर पुन्हा आला किंवा पुरळ पायापर्यंत गेल्यावर सुद्धा ताप कमी झाला नाही तर त्यातूनच पुढे न्यूमोनिया किंवा इतर आजार होऊ शकतात. गोवर हा लहान मुलांमध्ये आढळणारा, लागण होणारा आजार आहे. यात निरोगी मुलांना याचा फारसा त्रास होत नाही पण मूल जर कुपोषित असेल तर गोवारामुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात व मृत्यूही येऊ शकतो.
गोवरची लस देणे हा प्रतिबंधक उपाय आहे. ही लस सरकारी दवाखान्यात मिळते. ही लस मूल ९ महिन्यांचे असतांना देतात. लस टोचल्यावर थोडा ताप, अंग लाल होते व पुरळ येते. गोवर झाल्यास त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत.गोवरपासून बचावासाठी एकमेव उपाय म्हणजे लसीकरण, अद्याप या रोगावर कुठलेही औषध नाही. संक्रमित मुलांची काळजी घेणे, दुसऱ्या मुलांपर्यंत जाण्यास रोखणे, पाणी, ज्यूस पाजणे, स्वच्छता ठेवणे यासारखे उपचार करायला हवेत. लहान बालकांना वेळेत सर्व लसी द्याव्यात. गोवर झालेल्या लोकांच्या संपर्कात जाणे टाळावे, हात स्वच्छ धुणे असे उपाय आहेत.
मुंबईत अनेक संसर्गाचे आजार पसरत असताना आता मुंबईकरांवर आणखी संकट समोर आले असून विशेषत: गोवंडी भागात गोवर साथीच्या आजाराचा उद्रेक पाहायला मिळत आहे. यामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता मुंबई महापालिका देखील सतर्क झाली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत गोवरची आतापर्यंत सुमारे ३० प्रकरणे समोर आली असून या आजारात मुलांना ताप आणि डोळ्यातून पाणी येणे ही लक्षणे दिसतात. गोवर आजाराबाबत चिंता वाढली आहे. केंद्र सरकारने पथक मुंबईला पाठवले, या केंद्रीय पथकात डॉ. अनुभव श्रीवास्तव यांच्यासह नवी दिल्लीतील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, पुणे येथील तज्ज्ञांचा समावेश आहे.
एका अहवालानुसार, २९ संक्रमित मुलांपैकी जवळपास ५० मुलांना गोवरची लस देण्यात आली होती. त्यातील काही मुलांना ९ महिन्याहून कमी वयात ही लस दिली आहे. महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी म्हटले की, आम्ही गोवरच्या या प्रकोपाबाबत पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीसोबत रिसर्च करत आहोत. गोवर व्हायरस कुठल्या स्ट्रेनमुळे आलाय का याचा शोध घेतला जात आहे.
गोवरचा धोका सर्वाधिक लहान मुलांना आहे. संक्रमितांच्या संपर्कात येताच ७ ते १४ दिवसांमध्ये या आजाराची ४ प्रमुख लक्षणे दिसतात. त्यात १०४ डिग्रीपर्यंत ताप, खोकला, नाकातून सर्दी वाहणे, लाल डोळे, डोळ्यातून पाणी येणे. जेव्हा संक्रमित मुलांमध्ये गोवरची लक्षणे दिसतात त्यानंतर ३ दिवसांत तोंडात छोटे छोटे सफेद डाग येतात. शरीरावर लाल रंगाच्या खूणा दिसतात. एकदा गोवर होऊन गेल्यास तो पुन्हा होण्याची शक्यता फार कमी असेते. सुमारे १० दिवसात गोवरची लक्षणे जाणवू लागतात. खोकल्याने किंवा शिंकल्याने तो पसरु शकतो. लहान बाळांना जन्मानंतर नवव्या महिन्यात गोवरची लस दिली जाते. त्यानंतर दुसरा डोस दीड ते दोन वर्षात दिली जाते.
Mumbai 3 Children’s Death Measles Disease Symptoms