मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्करोगावरील उपचारासाठी देशभरातील अनेक रुग्ण मोठ्या प्रमाणात मुंबई किंवा दिल्लीची वाट धरतात. पण किमान खर्चात उत्तम उपचारासाठी बरीच कसरत करावी लागते. ही परिस्थिती लक्षात घेऊन टाटांनी नव्या कर्करोग रुग्णालयाचे निर्माणकार्य हाती घेतले आहे. येत्या चार वर्षांत मुंबईमध्ये हे रुग्णालय आकाराला येणार आहे.
मुंबईतील परळ भागात टाटा रुग्णालय आहे. कर्करोगींवर उपचार करणारे हे देशातील पहिले रुग्णालय आहे, हे विशेष. दरवर्षी लाखो रुग्णांवर याठिकाणी उपचार होत असले तरीही सातत्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खाटाही अपुऱ्या पडत आहेत. अश्यात सध्या अस्तित्वात असलेल्या रुग्णालयापुढील पाच एकर जागेवरच नवे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे येत्या महिन्याभरातच त्याचे बांधकामही सुरू होणार आहे.
८०० कोटी खर्च
नवीन रुग्णालयाच्या बांधकामासाठी जवळपास ८०० कोटी रुपये खर्च येणार असून हा निधी केंद्र सरकारच्या अणू ऊर्जा विभागाकडून उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याला केंद्र सरकारच्या सर्व विभागांची मान्यता मिळाली असून त्याचे कार्यादेशही जारी करण्यात आले आहेत. या इमारतीचे बांधकाम व इतर सर्व बाबींची जबाबदारी टाटा रुग्णालयाचे उपसंचालक आणि कर्करोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे यांच्याकडे असणार आहे.
डॉक्टर, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान
रुग्णालयाचे बांधकाम अडीच एकरात होणार असून उर्वरित अडिच एकरात डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी निवासस्थाने उभारली जाणार आहेत. तसेच बाहेरून येणाऱ्या रुग्णांची निवासाची सोय म्हणून धर्मशाळाही उभारण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
५८० खाटा, २१ ऑपरेशन थिएटर
रुग्णालयाचे बांधकाम अडिच एकरात होणार असून इथे ५८० खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील शंभर खाटा केमो उपचारासाठी असतील. तसेच एकूण २१ अॉपरेशन थिएटर असणार आहेत. यातील १५ मोठ्यांसाठी व सहा लहान शस्त्रक्रियांसाठी असतील. या सुविधेमुळे शस्त्रक्रियांची प्रतीक्षा यादी कमी होईल, असा विश्वास रुग्णालय प्रशासनाला आहे.
Mumbai 17 Floor Tata Cancer Hospital Coming Soon