मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईकरांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण हे तिन्ही जेवण म्हणजे फक्त वडा पाव. मुंबईत येऊन कुणी वडापाव खाल्ला नाही, असे होत नाही. खरं तर अनेक जण आवर्जून मुंबईतील वडापाव खातातच. वडापाव सुरू झाला तेव्हा तो १० पैशांना विकला गेला. आज १० रुपयांपासून थेट १०० रुपयांना तो मिळतो. असे असले तरी त्याची लज्जत कमी झालेली नाही किंवा शौकिनांचे प्रेमही. मुंबईत आज दिवस-रात्र विकला जाणारा वडापाव सुरुवातीला फक्त सहा ते सात तासांसाठी उपलब्ध होता. एकेकाळी वडापावचे दोन स्टॉल दुपारी असायचे आणि ते रात्री आठ वाजेपर्यंत चालायचे. आज आपण मुंबईतील अथिशय लोकप्रिय वडापाव सेंटर विषयी जाणून घेणार आहोत…
मुंबईत वडापावचा जन्म १९६६ मध्ये दादर स्टेशनच्या बाहेर अशोक वैद्य यांच्या फूड ट्रकमध्ये झाल्याचे मानले जाते. याच काळात दादरमध्ये सुधाकर म्हात्रे यांचा वडापावही सुरू झाल्याचे जुने मुंबईकर सांगतात. बटाट्याची सब्जी आणि पोळी खाण्याऐवजी त्यांनी बेसनमध्ये बटाट्याची भाजी तळून वडा बनवायला सुरुवात केली. जगभरामध्ये बॉम्बे बर्गर म्हणूनही वडापाव ओळखला जातो. तसेच आज जगभरामध्ये वडापाव पोहचला आहे. मात्र मुंबईकराइतके वडापावचे महत्व इतर कोणालाही समजणार नाही हेही खरचं. याच मुंबईत मिळणारे काही खास वडापाव आहेत.
मुंबईत दादर, परळ, गिरगाव इत्यादी ठिकाणी मराठी रेस्टॉरंट्सची संख्या वाढल्यानंतर बटाटावड्याला मुंबईत घर मिळाले. पण सुरुवातीच्या काळात फक्त बटाटावडा खाल्ला जायचा. पाव सोबत कधी खाल्ले यावर मतमतांतरे आहेत. दादर आणि इतर भागातील गिरणी कामगारांनी हे मौल्यवान खाद्यपदार्थ स्वीकारले.
२३ ऑगस्ट २००१ रोजी, धीरज गुप्ता यांनी वडापावचे भारतीय बर्गरमध्ये रूपांतर करून जंबो वडापाव फूड चेन सुरू केली. त्यामुळे ९ शहरांमध्ये त्यांच्या शाखा सध्या जागतिक वडापाव दिन साजरा करतात. इतरांनीही त्याचे अनुकरण सुरू केले आहे. वडापाव हे खरे तर सामान्य खाद्य आहे. मुंबईतील गिरणी कामगारांच्या संस्कृतीत ते लवकर रुजले. ते खाण्यासाठी प्लेट किंवा चमच्याची गरज नाही. जितक्या लवकर बनवले जाते तितक्या लवकर खाल्ले जाते. त्यामुळेच मुंबईची कार्यसंस्कृती म्हणून ओळखली जाऊ लागली. आज मुंबईत दररोज १८ ते २० लाख वडापाव विकले जातात.
१) सम्राट वडापाव – मिक्स भजींसोबत मिळणारा वडापाव म्हणजे सम्राट वडापाव. हा वडापाव विले पार्ले येथे मिळतो.
२) लक्ष्मण वडापाव – घाटकोपर पूर्व भागात लक्ष्मण वडापाव मिळतो. लक्ष्मण वडापाव जैन वडापावसाठी देखील प्रसिद्ध आहे.
३) भाऊ वडापाव – भाडूंपमधील फेमस वडापाव सेंटर म्हणजे ‘भाऊ वडापाव’. वाल्मिकी नगर या परिसरात हा वडापाव मिळतो.
४) कुंजविहार वडापाव – ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मिळणारा वडापाव म्हणजे कुंजविहारचा वडापाव. हा वडापाव मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव पैकी एक आहे.
५) आनंद वडापाव – विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस मिठीबाई कॉलेजच्या समोर आनंद वडापाव मिळतो.
६) गजानन वडापाव – चटणीसाठी लोकप्रिय असणारा वडापाव म्हणजे ठाण्यातील गजानन वडापाव. हा वडापाव ठाणे स्टेशनच्या पश्चिमेस मिळतो. हा वडापाव खाण्यासाठी खवय्यांची चांगलीच गर्दी असते.
७) ग्रॅज्यूएट वडापाव – भायखळा रेल्वेस्थानकाच्या पूर्वेस ग्रॅज्यूएट वडापाव मिळतो. हा वडापाव मुंबईमधील बेस्ट वडापावमधील एक आहे. गेल्या १८ वर्षांपासून लोक इथल्या वडापावचा अस्वाद घेत आहेत.
८) शिवाजी वडापाव – मिठीबाई कॉलेज जवळील शिवाजी वडापावदेखील लोकप्रिय आहे. अनेक लोकांना या वडापावची चव आवडते
९) बोरकर वडापाव – गिरगावातील बोरकर वडापाव हा देखील मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव आहे. या वडापावसोबत मिळणारी चटणी खवय्यांना प्रचंड आवडते. गिरगाव चौपाटीवर देखील या वडापावचा आनंद घेता येतो.
१०) अशोक वडापाव – प्रभादेवीमधील किर्ती कॉलेज जवळील अशोक वडापाव हा मुंबईतील प्रसिद्ध वडापावपैकी एक आहे. गेल्या ३५ वर्षांपासून येथे हा वडापाव विकला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील अनेक या वडापावचा अस्वाद घेतला आहे.
Mumbai 10 Famous Vada Pav Places
Food Item Popular