मुंबई – नाशिक मार्गावर दिपावलीच्या सुट्ट्या संपताच टोल नाक्यासह वाहतूक मार्गावर कमालीची वाहतूक कोंडी रविवारी ( ता. ७ ) दुपारी चार ते सहा वाजता निर्माण झाल्याने अनेक कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला. आपल्या कुटुंबीयांसोबत दीपावली सणासाठी मुंबई स्थित चाकरमानी जिल्ह्याच्या विविध भागात आपल्या कुटुंबा सोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात गेले होते. दिपावलीच्या सुट्ट्या संपताच वाहनांच्या लांबच लांब रांगा मुंबई-नाशिक मार्गावरून जातांना दिसत होत्या. यामुळे वाहतूक काही काळ संथ गतीने सुरू असल्याचे चित्र होते. मात्र याच मार्गावर घोटी टोल नाक्यावर या वाहतुकीचा थरारक पाह्यला मिळाला. मिळेल तेथून वाट काढत वाहन चालक व दुचाकीस्वार आपले वाहन टोल नाका ओलांडून पुढे जाण्यासाठीची जणू स्पर्धा निर्माण झाली होती. यातच पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने अनेकांना वेळेत घरी पोहचण्याचे वेध लागले होते. यातच वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजुला वाहनाच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. टोल व्यवस्थापन व वाहन चालक यांच्यात खटके उडू लागले. यामुळे काही तासांनी वाहतूक खुली करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. स्थानिक व्यवसायिक वाहने उभी राहत नसल्याने हैराण झाल्याचे पाहायला मिळत होते.