मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी सागरी प्रवासी जलवाहतूक मार्गास मान्यता देण्यात आली आहे. मुंबईपासून या मार्गावर प्रवासी सागरी जलवाहतूक प्रथमच सुरू होत असून हे क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे, असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.
माझगाव भाऊचा धक्का येथे एम टू एम प्रिन्सेस या रो-रो कंपनीची प्रवासी वाहतूक सेवेसाठी पूर्वतयारीची पाहणी बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केली.
मंत्री राणे म्हणाले “सागरी जलमार्गाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी तीन तास व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी पाच ते सहा तास इतका अवधी लागणार असून कोकणवासीयांच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. या वाहतुकीला केंद्र व राज्य सरकारच्या विविध परवानग्या प्राप्त करूनच मान्यता दिली जाते. येथून पुढे या मार्गावर सागरी प्रवासी जलवाहतुकीसाठी अजून वाहतूक कंपन्या पुढे येत आहेत.”
यावेळी त्यांनी एम टू एम प्रिन्सेस या प्रवासी बोटीची फिरून पाहणी केली. आवश्यक पूर्व तयारी झाली असली तरी सागरी वाहतुकीसाठी समुद्री वातावरण या बाबी तपासून ‘ एम टू एम प्रिन्सेस’ कंपनीची रो-रो प्रवासी जलवाहतूक सुरू होणार आहे. अशी माहिती जलवाहतूक सेवा कंपनीच्या वतीने यावेळी देण्यात आली.
भाऊचा धक्का ते जयगड तीन तास तर भाऊचा धक्का ते विजयदुर्ग पाच तासांचा प्रवास असेल. येथे जेट्टीची सुविधा असून, जेट्टीवरून शहरात जाण्यासाठी बसेसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. २५ नॉट्स स्पीडची ही ‘एम टू एम’ नावाची रो-रो बोट असणार आहे जी दक्षिण आशीयातील वेगवान बोट आहे. यामध्ये इकोनॉमी वर्गात ५५२ आसनांची व्यवस्था, प्रिमीयम इकोनॉमी मध्ये ४४, बिझनेस मध्ये ४८, तर फर्स्ट क्लासमध्ये १२ प्रवाशांची क्षमता असणार आहे. तर, ५० चार चाकी, ३० दुचाकी क्षमता असलेली ही रो-रो आहे.
इकोनॉमी क्लाससाठी दोन हजार ५०० रूपये दर आकारला जाणार आहे. तर, प्रिमियम इकोनॉमीसाठी प्रवाशांसाठी चार हजार रूपये, बिझनेस क्लाससाठी सात हजार ५००, फर्स्ट क्लाससाठी नऊ हजार रूपये दर आकारला जाणार आहे. तसेच, चार चाकीसाठी ६ हजार, दुचाकीसाठी एक हजार (दर), सायकलसाठी ६०० (दर), मिनी बससाठी १३ हजार आणि बसच्या आसनक्षमतेप्रमाणे दर वाढत जाणार आहेत. भविष्यात श्रीवर्धन, मांडवा असे विविध थांबे असणार आहेत तर त्यासाठी जेट्टीही तयार करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री राणे यांनी दिली.