इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नाशिकमध्ये आणखी एका बहुविख्यात कंपनीची तब्बल १०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे ही बाब नाशिकच्या उद्योग जगतासाठी अतिशय उत्साहवर्धक आहे. जनरल मिल्स इंडिया या कंपनीने नाशकात बेकरी उत्पादनांचा अत्याधुनिक प्रकल्प साकारण्याचे निश्चित केले आहे. कंपनीचा हा भारतातील दुसरा प्रकल्प आहे.
पॅकेज्ड फूड्स कंपनी जनरल मिल्स इंडियाने सांगितले की भारतात पिल्सबरी बेकिंग मिक्ससाठी दुसरी उत्पादन सुविधा नाशकात उभारण्यासाठी १०० कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी आहे. कंपनीने नाशिकमध्ये नवा प्रकल्प सुरू करण्यासाठी भूमीपूजन केले आहे. भारतीय बाजारपेठेसाठी पिल्सबरी बेकिंग मिक्स तयार करण्यासाठी केंद्रबिंदू म्हणून हा प्रकल्प काम करेल. ऑगस्ट २०२४ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे.
कंपनीने एका निवेदनाक सांगितले आहे की, “या नवीन सुविधेच्या जोडणीसह, जनरल मिल्स इंडिया तिच्या उत्पादनाचा ठसा दुप्पट करेल, ज्यामुळे कंपनीला भारतातील पिल्सबरी बेकरी सोल्यूशन्सची वाढती मागणी पूर्ण करता येईल. पिल्सबरी ब्रँडची बेकिंग मिक्स सेगमेंटमध्ये मजबूत उपस्थिती आहे आणि भारतातील वाढत्या बेकरी आणि फूड सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये बेकिंग उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी तो सुस्थितीत आहे,”
पिल्सहरी कंपनीने १९९९ मध्ये भारतात बेकिंग मिक्स उत्पादन सुरू केले. गेल्या काही वर्षांपासून पॅकबंद खाद्यपदार्थ, तसेच बेकिंग उत्पादनांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळेच कंपनीने नाशकात उत्पादन कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील बेकरी उद्योगात उल्लेखनीय वाढ होत आहे. वाढदिवसाव्यतिरिक्त, केक कटिंग हा वर्धापन दिन, यशाच्या मेजवानीसाठी, उत्सवांमध्ये आणि सकारात्मक प्रसंगांमध्ये केला जात आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या केकची मागणी वाढल्याचे जनरल मिल्स इंडियाचे भारताचे संचालक आनंद खुराना म्हणाले. नवीन सुविधेमुळे भारतातील अधिक बेकर्सना सेवा देण्याच्या आणि त्यांच्या व्यवसायाच्या वाढीला पाठिंबा देण्यासाठी पिल्सबरीची वचनबद्धता दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले.
जनरल मिल्सच्या जागतिक वाढीच्या धोरणात भारत हे निर्णायक आहे, असे कंपनीने म्हटले आहे. “जगभरातील जनरल मिल्सच्या प्राधान्य बाजारपेठांमध्ये भारताचा समावेश होतो. अलिकडच्या वर्षांत, भारतातील आमच्या व्यवसायाने सातत्याने वाढ केली आहे आणि नवीन उत्पादन प्रकल्पामुळे अधिक ग्राहकांना आनंद देऊन आणि ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करून भारतात वाढ करण्याच्या आमच्या समर्पणाला बळकटी मिळते,” असे जनरल मिल्सच्या ग्लोबल इमर्जिंग मार्केट्सचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाल्की राधाकृष्णन यांनी म्हटले आहे.
जनरल मिल्स ही Cheerios, Nature Valley, Blue Buffalo, Haagen-Dazs, Pillsbury, Betty Crocker, Yoplait, Annie’s, Wanchai Ferry, Yoki आणि बरेच काही या ब्रँड अंतर्गत विविध खाद्यपदार्थांची विक्री करते. कंपनीचे मुख्यालय अमेरिकेतील मिनेसोटा येथे आहे. यंदाच्या वर्षी जनरल मिल्सने तब्बल २० अब्ज डॉलरची निव्वळ विक्री केली आहे.
Multinational Company Investment in Nashik
General Mills Bakery India Plant Food Cake