इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – युनिलिव्हर या जगप्रसिद्ध कंपनीच्या अनेक ब्रँडच्या शॅम्पू मध्ये कॅन्सर निर्माण करणारे रसायन सापडल्याने खळबळ उडाली आहे. कंपनीने यूएस बाजारातून Dove, Nexxus, Suave, TIGI आणि TRESemmé aerosol ड्राय शॅम्पू परत मागवले आहेत.
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, जे शॅम्पू मागवले आहेत त्यामध्ये बेंझिनची उपस्थिती आढळून आली आहे. या रसायनामुळे कॅन्सर होऊ शकतो. यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशननुसार, ही उत्पादने ऑक्टोबर २०२१ पूर्वी तयार करण्यात आली होती आणि देशभरातील किरकोळ विक्रेत्यांना वितरीत करण्यात आली होती.
बेंझिन या घटकामुळे मानवांमध्ये कर्करोग होऊ शकतो. एफडीएने आपल्या रिकॉल नोटीसमध्ये म्हटले आहे की, बेंझिन मानवी शरीरात अनेक प्रकारे प्रवेश करू शकते. तो वासाने, तोंडातून आणि त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करू शकतो. त्यामुळे रक्ताचा कर्करोग होण्याची शक्यता आहे.
वापर तात्काळ थांबवा..
लोकांनी अशा उत्पादनांचा वापर करणे थांबवावे असे आवाहन FDA कडून करण्यात आले आहे. तसेच या उत्पादनावर खर्च केलेले पैसे परत मिळवण्यासाठी UnileverRecall.com च्या वेबसाइटला भेट द्यावी, असेही सांगितले आहे. युनिलिव्हरने अद्याप यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.
३०हून अधिक उत्पादने मागवली परत
युनिलिव्हरच्या नवीन निर्णयामुळे पर्सनल केअर उत्पादनांमध्ये एरोसोलच्या उपस्थितीबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील दीड वर्षात बाजारातून अनेक एरोसोल सनस्क्रीन परत मागवण्यात आले आहेत. यामध्ये जॉन्सन अँड जॉन्सनचे न्यूट्रोजेना, एजवेल पर्सनल केअर कंपनी बनाना बोट आणि बेयर्सडॉर्फ एजीच्या कॉपरटोनचा समावेश आहे.
मागील वर्षी प्रॉक्टर अँड गॅम्बलने ३० हून अधिक एरोसोल स्प्रे हेअरकेअर उत्पादने देखील परत मागवली होती. यामध्ये ड्राय शॅम्पू आणि ड्राय कंडिशनरचा समावेश होता. या उत्पादनांमध्ये बेंझिन असू शकते, असा इशारा कंपनीने दिला होता. कंपनीने डझनहून अधिक ओल्ड स्पाईस आणि सीक्रेट ब्रँड्सचे डिओडोरंट्स आणि स्प्रे देखील परत मागवले आहेत. त्यामध्ये बेंझिन असू शकते, अशी भीती कंपनीला असल्याचे समोर येत आहे.
Multinational Brand Shampoo Cancer Threat Recall Products