इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशात तीन विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर तेथील राजकीय वातावरण तापू लागले आहे, त्यातच अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते पक्षांतर करीत असून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशची सत्ता कोण काबीज करतो? याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना जोरदार तडाखा देण्यासाठी भाजपने मोठा डाव खेळला आहे. अखिलेश यांची लहान वहिनी आणि मुलायमसिंग यांची सून अपर्णा या भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
छोट्या मोठ्या नेत्यांच्या पक्षांतराच्या कार्यक्रमांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच सपाचे संस्थापक नेते मुलायम सिंह यादव यांचे मित्र हरी ओम यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर आता खुद्द मुलायम सिंह यांची धाकटी सून आणि प्रतीक यादव यांच्या पत्नी अपर्णा यादव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे अपर्णा या लखनऊच्या कँट विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार असू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. कारण याबाबत इंटरनेट मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र, या चर्चेबाबत भाजप किंवा अपर्णा यादव यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. अपर्णा यादव यांनी २०१७ ची विधानसभेची निवडणूक लखनऊच्या कँट भागातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लढवली होती, परंतु त्यांना भाजप उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
फिरोजाबादच्या सिरसागंज मतदारसंघातील सपा आमदार हरी ओम यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हरी ओम हे मुलायम सिंह यांचे नातेवाईक आणि मित्र आहेत. माजी आयपीएस अधिकारी असीम अरुण आज (१६ नोव्हेंबर) भाजपचे सदस्यत्व घेणार आहेत. त्यापुर्वी ते भाजप मुख्यालयातही पोहोचले होते. कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी नुकतेच स्वेच्छानिवृत्ती घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. असीम यांना कन्नौजच्या जागेवर भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपचे तीन मंत्री, स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान आणि धरमसिंग सैनी यांनी स्व पक्ष सोडून सपामध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षांतरावरून राजकीय पक्षांमध्ये वाद सुरू झाला आहे.
पोलिसांनी समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर नोटीस चिकटवली. पोलिसांच्यावतीने समाजवादी पक्षाला उद्देशून लिहिलेल्या नोटीसमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असल्याचे म्हटले आहे. कोविड साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या रॅली, मिरवणुका व सभांना बंदी घालण्यात आली आहे. सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, तसेच पोलिसांनी नागरिकांनाही नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी काही पक्षांच्या कार्यालयाबाहेर कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.