नाशिक – मुंबई – पुणे – नाशिक हा सुवर्णत्रिकोण आहे. मुंबईच्या सारख्या अंतरावर पुणे आहे आणि २० वर्षांपूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाला त्यानंतर पुण्याचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला. त्यावरून कनेक्टिव्हिटी किती महत्त्वाची आहे हे लक्षात येते. आणि आता नाशिकही लोहमार्ग, रस्तेमार्ग, हवाई मार्ग यांच्या माध्यमातून विकासाच्या उंबरठ्यावर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दोन एअरपोर्ट जवळ नाही ते नाशिकमध्ये आहेत. शिर्डी आणि नाशिक हे एअरपोर्ट एकमेकांपासून ५५ किमी अंतरावर आहेत.नाशिक एअरपोर्टच्या माध्यमातून ६ मोठ्या शहरात कनेक्टिव्हिटी मिळवण्यात यश आलं आहे, असे मत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केले.
गेल्या ७ वर्षांचा त्यांच्या कामाचा आढावा घेताना ते म्हणाले की, नाशिक मुंबई या सहापदरी रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. समृद्धी महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. ग्रीनफील्ड प्रोजेक्ट सुरू होण्याच्या मार्गावर आहे. हा प्रोजेक्ट आपल्यासाठी वरदान ठरणार आहे. नाशिक मुंबई, मुंबई पुणे तसेच नाशिक पुणे या नवीन रेल्वेलाइनसाठी रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. या लोहमार्गामुळे आपण सुवर्णत्रिकोणात पूर्ण होणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, इन्फ्रास्ट्रक्चर आले तर रोजगार निर्मिती होते आणि त्यातूनच विकास होतो. रोजगारनिर्मिती विषयी बोलताना ते म्हणाले की, इंडस्ट्रीअल विकास हा महत्वाचा आहे. यासाठी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉर प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न आहे. या अंतर्गत सिन्नर, इगतपुरी हे भाग सुद्धा कव्हर होतील. पहिल्या टप्प्यात औरंगाबाद ला हा प्रोजेक्ट गेला. नाशिकला पाणी नाही म्हणून आपल्याला नाकारलं. खर म्हणजे नाशिक मधून औरंगाबादला पाणी पुरवठा होतो आणि आपल्यालाच त्या मुद्द्यावरून नाकारलं, ही खंत आहे. पण आता नदीजोड प्रकल्प सुरू केले आहेत. त्या माध्यमातून इंडस्ट्रीसाठी जे पाणी लागणार आहे ते उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी राज्यशासन जागा उपलब्ध करून देत आहे तर केंद्रशासन इन्फ्रास्ट्रक्चर उभे करून देत आहे यातून काही वर्षात नाशिकला मोठ्या प्रमाणावर नक्की रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी दाखवला.
इंजिनिअरिंगचे अनेक विद्यार्थी पुणे, बंगलोरला जातात. आपल्याकडच टॅलेंट बाहेर जातं पण आता लवकरच नाशिकला आयटी पार्क साकारणार आहोत. सेन्ट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग ही संस्था आता नाशिकला येणार आहे. ही संस्था आधी पनवेल इथे उभी राहणार होती पण जागेअभावी तिथे शक्य नाही म्हणून केंद्राला नाशिक हा पर्याय सुचवला आणि त्याला मंजुरी मिळाली. या माध्यमातून दरवर्षी २००० मुलांना नोकरी मिळेल.
मेट्रोविषयी त्यांनी सांगितले की, युतीच्या काळात मेट्रोची घोषणा केली. त्या प्रस्तावावर केंद्राने काही त्रुटी सुचवल्या. पुन्हा हा प्रस्ताव राज्याकडे आला. त्याचा पाठपुरावा केला. त्याची पूर्तता करून केंद्राच्या नगरविकास खात्याकडे पुन्हा प्रस्ताव पाठवला. मागच्या अर्थसंकल्पात नाशिकच्या मेट्रोची घोषणा केली होती. केंद्रासरकारकडून अंतिम मान्यता मिळाली की हे काम लवकरच सुरू होईल. यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टचा मार्ग सुरळीत होईल. सलग दोनदा खासदार म्हणून निवडून येण्याचा इतिहास त्यांच्या नावावर आहे त्याविषयी ते म्हणाले की, या काळात लोकसंपर्क ठेवण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न केला. लोकप्रतिनिधी या नात्याने मी जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि लोकांच्या विश्वासामुळे हा इतिहास घडू शकला, असे ते म्हणाले.