जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा )– मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना अशी योजना असल्याचे भासवुन समाजमाध्यमाव्दारे काही संदेश प्रसारीत होत आहेत. असे वृत्त केवळ अफवा असुन, नागरीकांनी त्यावर विश्वास ठेवु नये व फसवणुकीला बळी पडु नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. तडवी यांनी केले आहे.
या प्रकारच्या फसव्या संदेशा किंवा जाहिरातींमध्ये दिनांक ०१ मार्च २०२० नंतर दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यु झाला आहे व बालकांचे वय १८ वर्षापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील ०२ मुलांना बाल सेवा योजनेत दरमहा ४ हजार रुपये मिळणार आहेत व त्यांचे फॉर्म तहसिल कार्यालयात उपलब्ध आहेत. सदर अर्ज भरुन जिल्हा बाल संरक्षण कक्ष/जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असा मजकुर प्रसारित करण्यात येत आहे.
महिला व बाल विकास विभागाकडुन “मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना” अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसुन हा संदेश केवळ अफवा आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवु नये, याबाबत दक्षता बाळगावी. अशा अफवा असलेल्या सोशल मिडिया पोस्टवर विश्वास ठेवु नये. त्या प्रसारित करु नये असे आवाहन आर.आर. तडवी यांनी केले.