नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३० वा दीक्षान्त सोहळा येत्या सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजता विद्यापीठ आवारात होत आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. सी. पी. राधाकृष्णन हे असणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. अशोक कोळस्कर हे स्नातकांना उद्देशून दीक्षान्त भाषण करणार आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे व प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी ऑनलाईन नोंदणी केलेले स्नातक उपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत. या समारंभामध्ये यावर्षी एकूण १ लाख ३९ हजार २१८ विद्यार्थी पदवी प्राप्त करणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव श्री. दिलीप भरड व परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांनी दिली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील १३ विद्याशाखा व राज्यभरातील आठ विभागीय केंद्रे आणि सुमारे १४२८ अभ्यासकेंद्रे यांच्यामार्फत राज्यभरात ज्ञानदानाचे कार्य केले जाते. त्यानुसार विद्यापीठात चालू शैक्षणिक वर्षात विविध अभ्यासक्रमांसाठी ४ लक्ष १७ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ट आहेत. या ३० व्या दीक्षान्त समारंभांसाठी पीएच. डी., पदव्युत्तर पदवी, पदवी व पदविका अशा विविध प्रकारच्या ९६ शिक्षणक्रमांतील १ लाख ३९ हजार २१८ विद्यार्थ्यांना यंदा पदवी प्रदान केली जाणार आहे.
वैशिष्ट्ये :–
- पदवीधारकात ६० वर्ष वयावरील १९५ विद्यार्थ्यांचा समावेश.
- विविध शिक्षणक्रम पूर्ण करून पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ३३ बंदीजनांचा समावेश.
- एक लाख ३९ हजार २१८ पैकी पदविकाधारक १५ हजार ३७०, पदवीधारक ९१ हजार १९७, पदव्युत्तर पदवीधारक ३२ हजार ६४३, पी एच डी धारक ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात ८१ हजार ८७० विद्यार्थी व ५७ हजार ३४८ विद्यार्थिनी आहेत.
- पदवीधारक विद्यार्थ्यांमध्ये १२१ विद्यार्थी दृष्टीबाधित आहेत.
- या दीक्षान्त सोहळ्यात विशेष प्राविण्य मिळविलेल्या १० स्नातकांना सुवर्णपदक (गोल्ड मेडल) मा. कुलपती यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
- ब्लॉक चेन प्रणाली आधारित प्रमाणपत्र :- दीक्षान्त समारंभानंतर विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणारी पदवी व पदविका प्रमाणपत्रे वैशिष्ट्यपूर्ण असून त्यावर ब्लॉक चेन प्रणालीवर आधारित क्यु आर कोड छापलेला आहे. सदर क्यू आर कोड कुठेही व कधीही स्कॅन करून प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करता येऊ शकेल. पदवी / पदविका प्रमाणपत्राची डीजीटल कॉपी, ई-सुविधा मोबाईल ॲपमध्ये कायमस्वरूपी उपलब्ध राहणार असून, दीक्षान्त समारंभ संपल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राची डीजीटल कॉपी डीजीलॉकरवर उपलब्ध असणार आहे.
स्नातकांसाठी महत्वाची सूचना :-
या दीक्षान्त समारंभासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या स्नातकांनी अनामत रक्कम भरल्याची पावती परीक्षा विभागात दाखवून सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान दीक्षान्त शाल घ्यावी व स्नातकांनी पांढरा शुभ्र पोशाख व शाल परिधान करून सभामंडपात सुरक्षितेच्या दृष्टीने सकाळी ०९.०० वाजता स्थानापन्न व्हावे. स्नातकांना समारंभाच्या शिष्टचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व सूचना https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=28329 या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
दीक्षान्त समारंभासाठी मोफत वाहन व्यवस्था :-
सर्व स्नातकांना विद्यापीठात दीक्षान्त समारंभ स्थळी पोहचता यावे याकरिता विद्यापीठातर्फे विनामूल्य बस व टेम्पोट्रॅव्हलर वाहनाची सोय करण्यात आलेली आहे. त्यानुसार सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत बारदान फाटा (गंगापूर रोड) ते विद्यापीठ व दीक्षान्त समारंभ कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान विद्यापीठ ते बारदान फाटा अशी वाहतूक व्यवस्था राहील. विद्यार्थ्यांनी वाहतुक व्यवस्था सुविधा प्राप्त करण्यासाठी दीक्षान्त समारंभाच्या दिवशी दिलेल्या वेळेत वाहनचालक श्री. शरद पवार (९३५९२९७१७९) व श्री. संदीपान जाधव (९८९०५४३००४) यांच्याशी दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.