नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कारामुळे मराठी, बंगाली व आसामी या अभिजात भाषांची येथे सुरेख गुंफण झाल्याचे बघावयास मिळत आहे. मराठी भाषेला जरी नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी तिला समृद्ध करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. त्यासाठी विद्यापीठात भाषा अनुवाद केंद्र सुरु आकरण्यात आलेले आहे. तसेच देशातील प्रत्येक विद्यापीठात मराठी विभाग होण्यासाठी व परदेशात देखील मराठीचा विस्तार करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न हवेत, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी येथे केले.
येथील सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात आयोजित विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे दिल्या जाणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमात सन २०२२ चा हा पुरस्कार प्रसिद्ध बंगाली कवी अमिताभ गुप्ता यांना तर सन २०२३ चा पुरस्कार आघाडीचे आसामी कवी श्री. नीलिमकुमार यांना प्रदान करण्यात आला. रोख रक्कम एक लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी व अनुवादक आणि पुरस्कार निवड समिती अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलसचिव श्री. दिलीप भरड, कुसुमाग्रज अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात बोलतांना पुढे मा. कुलगुरू सोनवणे म्हणाले की कुसुमाग्रजांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी त्यांच्या या अस्सल भूमीत अस्सल कवींची निवड करण्यात आलेली आहे. कवी व सामान्य व्यक्ति यांच्यातील फरक समजून घेताना आपल्या लक्षात येते की विचार किंवा विषय छोटा अथवा मोठा असला तरी त्याला नेमक्या शब्दात मांडण्याचे कौशल्य हे कवींकडे असते, असेही ते म्हणाले. यावेळी आपल्या सत्कारास उत्तर देतांना बंगाली कवी श्री. अमिताभ गुप्ता म्हणाले की लहानपणी आई वडिलांकडून या नाशिक शहराविषयी ‘जनस्थान’ नगरी म्हणून ऐकले होते. आज या पुरस्काराच्या निमित्ताने येथे यावयास मिळाले. कवी कुसुमाग्रज हे काव्याचा अविरत झरा होते तसेच येथील लोकं देखील उत्साही असल्याचे दिसून येते असे ते म्हणाले. आघाडीचे आसामी कवी श्री. निलीमकुमार आपल्या सत्कारास उत्तर देतांना म्हणाले की सदर पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. त्यासोबत स्वत:च्या भाषेप्रती माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. आयुष्यातील कडू – गोड आठवणींसोबत जगात असताना कवितेपासून मी एक दिवस देखील दूर राहू शकत नाही. कविता माझा श्वास व माझे जगणे असून तीच माझा संसार व संवादाची भाषा असल्याचे भावोद्गार देखील त्यांनी काढले.
यावेळी बंगाली कवी श्री. अमिताभ गुप्ता यांनी ‘बांगला भाषा’ व ‘ध्वस्त माणूस’ या आपल्या दोन कविता बंगाली व इंग्रजी भाषेतून सादर केल्या. त्यांच्या या कवितांचा मराठी अनुवाद श्री. दिलीप धोंडगे यांनी सादर केला. आसामी कवी श्री. निलीमकुमार यांनी ‘बारीश’ व ‘भला आदमी’ या आपल्या कविता आसामी व हिंदी भाषेतून सादर केल्या. अनुवादक श्री. श्रीधर नांदेडकर यांनी त्यांच्या इतर दोन आसामी कवितांचा मराठी अनुवाद ‘कविता मरते आहे’ व ‘मीठ’ सादर केला. त्याचबरोबर श्री. दिलीप बोस यांनी बंगाली कवी श्री. अमिताभ गुप्ता यांच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद सादर केला.
प्रास्ताविक कुसुमाग्रज अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले. त्यात त्त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे सन २०१० पासून दरवर्षी भारतीय साहित्यात काव्यरूपी महत्वाचे योगदान देणाऱ्या महत्वाच्या अ-मराठी कवीला ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार’ दिला जात असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी दोघा कवींना देण्यात आलेल्या मानपत्राचे देखील वाचन केले. प्रसिद्ध कवी व अनुवादक डॉ. चंद्रकांत पाटील यांनी पुरस्कार निवड समिती अध्यक्ष म्हणून आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचलन विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे सहयोगी सल्लागार श्री. दत्ता पाटील यांनी तर आभारप्रदर्शन कुलसचिव श्री. दिलीप भरड यांनी केले. यावेळी विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. संजीवनी महाले, परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांच्यासह विद्यापीठ विद्याशाखा संचालक, अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, विद्यार्थी आदीसह शहर परिसरातील काव्य रसिक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.