नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांना येत्या दिनांक १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विद्यापीठाने आपल्या १२ विविध विद्याशाखांच्या १३८ वेगवेगळ्या प्रकारच्या पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि प्रमाणपत्र शिक्षणक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना नियमित पदवीसोबत दुरशिक्षणाद्वारे अधिकची एक पदवी मिळवता येईल किंवा मुक्त विद्यापीठाच्याच दोन पदव्यांना एकाचवेळी प्रवेश घेता येईल.
विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी विद्यापीठाने पारंपारिक शिक्षणक्रमांसह नवीन आणि व्यावसायिक शिक्षणक्रम देखील सुरु केलेले आहेत. त्यात विशेषतः संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान, कृषी तसेच व्यावसायिक क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन डेटा ॲनालिटिक्स, आयबीएम सर्टिफिकेट, डिजिटल फोटोग्राफी, शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन, श्वानपालक प्रबोधन, सौर व पवन उर्जा आदींशी संबंधित नवीन शिक्षणक्रम यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना घरबसल्या आणि त्यांच्या सवडी व आवडीनुसार शिक्षण पूर्ण करण्याची संधी मुक्त विद्यापीठ दूरस्थ शिक्षण प्रणालीतून उपलब्ध करून देत आले आहे. नोकरी – व्यवसाय करणारे, गृहिणीं किंवा ज्यांना नियमित महाविद्यालयात जाणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
प्रवेश घेण्यासाठी इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://ycmou.digitaluniversity.ac/) भेट द्यावी किंवा विद्यापीठाच्या नजीकच्या अभ्यास केंद्राशी संपर्क साधावा व आपल्या उज्वल भविष्यासाठी ऑनलाईन प्रवेश घ्यावा. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या हेल्पलाइन क्रमांक ०२५३ – २२३०५८० / २२३१७१५ /२२३०१०६ / २२३१७१४ किंवा ९३०७५७९८७४, ९३०७५६७१८२, ९२०७०४६७५० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाचे विद्यार्थी सेवा विभाग संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी केले आहे.