नाशिक (प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषि विज्ञान केंद्र येथे सात दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मधमाशी व मध अभियान अंतर्गत दिनांक ३ ते ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील २५ शेतकरी, उद्योजक आणि ग्रामीण युवक – युवतींनी सहभाग घेतला.
दिवसेंदिवस पिकांमध्ये परागीभवन न होण्याची गंभीर होत असलेली समस्या, परागीभवना अभावी कमी होत असलेली उत्पादकता, रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मधुमक्षिका पालनात येणाऱ्या अडचणी, मधुमक्षिकांबाबत असणारे गैरसमज, नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या मधुमक्षिका पोळ्यांमधील मध काढण्याच्या अशास्रीय पद्धती व त्यामुळे मधुमक्षिका वसाहती नष्ट होणे, मधुमक्षिका पालनात व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण करण्याची गरज, मधाच्या गुणवत्तेबाबत जागृतीची आवश्यकता, मध व्यतिरिक्त मधुमक्षिका पालनातून मिळणाऱ्या बहुमोल उत्पादनांविषयी जागरुकता आदी बाबी लक्षात घेऊन हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षणातील विविध सत्रांमध्ये महाराष्ट्रातील नामांकित तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यात प्रामुख्याने मधुमक्षिका पालनाची कौशल्ये, मधुमक्षिका संगोपन व संवर्धन, मधुमक्षिकांचे विविध प्रकार व वैशिष्ट्ये, परागीभावनात व पीक उत्पादन वाढीसाठी त्यांची भूमिका, एपीथेरेपी, मध संकलन व प्रक्रिया, मार्केटिंग व व्यवसाय संधी आदींचा समावेश होता. प्रशिक्षणार्थींसाठी अभ्यास सहलीचेही आयोजन करण्यात आले. यासोबतच प्रशिक्षणार्थींसाठी प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. त्यात मधुमक्षिका वसाहतींची मांडणी, वसाहतींचे विभाजन, पेट्यांची रचना व पोळे बांधणी, रोगनियंत्रणासाठी साफसफाई, राणी घर, नर घरे व कामकरी माशी यांची घरे तपासणे, पोळ्यापासून मेण तयार करणे, बागेत मधुमक्षिका पेट्यांची मांडणी करणे, मध काढणी प्रक्रिया, इत्यादी बाबींचा समावेश होता.
राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ यांच्या अर्थसहाय्यातून आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रशिक्षणार्थींना सहभागाबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विद्यापीठाच्या या कृषि विज्ञान केंद्रामार्फत वेळोवेळी शेतकरी व ग्रामीण युवक – युवतींना मधुमक्षिका पालन या विषयावर मोठ्या प्रमाणावर तांत्रिक मार्गदर्शन केले जाते. त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव श्री. दिलीप भरड आणि कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्रज्ञ व प्रमुख डॉ. नितीन ठोके यांनी केले आहे. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी श्री. ऋषिकेश पवार आणि श्री. अमोल पुंड यांनी परिश्रम घेतले.