नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेव)-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या १४ नवीन शिक्षणक्रमांना दूरस्थ शिक्षण मंडळ अर्थात डीईबीने मान्यता दिली आहे. त्यात तीन पदवीपूर्व (युजी) आणि अकरा पदव्युत्तर (पीजी) शिक्षणक्रम आहेत. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्त आणि दूरस्थ शिक्षण पद्धतीच्या (ओडीएल) या शिक्षणक्रमांसंदर्भातील एकत्रित प्रस्ताव दूरस्थ शिक्षण मंडळाकडे सादर करण्यात आला होता. त्यातील प्रशासकीय, तांत्रिक व आवश्यक शैक्षणिक बाबींची आपल्या तज्ञ समितीद्वारे पडताळणी केल्यानंतर दूरस्थ शिक्षण मंडळाने प्रस्तावित सर्व १४ शिक्षणक्रमांना मान्यता दिली आहे.
त्यानुसार विज्ञान विद्याशाखेचे चार वर्षे कालावधीचे व ऑनर्स असलेले १) अग्निशामक आणि औद्योगिक सुरक्षा व २) पर्यावरण शास्त्र हे दोन शिक्षणक्रम तसेच प्रत्येकी दोन वर्षे कालावधीचे पदव्युत्तर ३) एम. एस्सी. – मॅथेमॅटिक्स विथ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स ४) एम. एस्सी. – झुलॉजी (प्राणीशास्त्र), ५) एम. एस्सी. – केमिस्ट्री (रसायनशास्त्र) ६) एम. एस्सी. – मॅथेमॅटिक्स (गणित) ७) एम. एस्सी – फिजिक्स ८) एम. एस्सी – बॉटनी (वनस्पतीशास्त्र) सहा शिक्षणक्रम मिळून आठ शिक्षणक्रम आहेत. मानव्यविद्या व सामाजिकशास्त्र विद्याशाखेचे पदव्युत्तर व दोन वर्षे कालावधीचे १) एम. ए. उर्दू, २) एम. ए. हिंदी, ३) एम. ए. लोकप्रशासन ४) एम. ए. मराठी व ५) एम. ए. अर्थशास्त्र अशा पाच शिक्षणक्रमांचा समावेश आहे.
तसेच शिक्षणशास्त्र विद्याशाखेचा दोन वर्षे कालावधीचा बॅचलर ऑफ एज्युकेशन हा एक शिक्षणक्रम आहे. या मान्यतेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना संबंधित सर्व विषयांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड व अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्राचे संचालक व नियोजन अधिकारी डॉ. मधुकर शेवाळे यांनी दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या यासह विविध शिक्षणक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ९३०७५७९८७४, ९३०७५६७१८२ वा ९२७२०४६७२५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.