नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) :– महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना कौशल्य-आधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सागरी शिक्षण, शिपिंग, लॉजिस्टिक्स आणि संबंधित सागरी उद्योगात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. यासंदर्भात नवी मुंबई स्थित नामांकित ‘नोव्हा मेरीटाईम अकादमी’ (एनएमए) सोबत विद्यापीठातर्फे सामंजस्य करार (एमओयु) करण्यात आला आहे. या कराराद्वारे पदविका, पदवी, आणि पदव्युत्तर शिक्षणक्रम तसेच लघु आणि दीर्घकालीन ‘अपग्रेडेशन’ आणि ‘अक्रेडिटेशन’ प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध होईल. त्यानुसार लवकरच दोन वर्ष कालावधीचा ‘अॅडव्हान्स डिप्लोमा इन शिपिंग मॅनेजमेंट अँड लॉजिस्टिक्स’, दीड महिने कालावधीचा फॅमिलरायझेशन कोर्स फॉर सीफेअरर्स वर्किंग ऑनबोर्ड इनलँड व्हेसल्स व चार दिवसांचा स्टिअरिंग गियर टेस्ट अॅज पर सोलास (SOLAS – Safety of Life at Sea) हा सिम्युलेटर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला जाईल.
याप्रसंगी बोलतांना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले की गरजांवर आधारित आणि व्यावसायिक शिक्षणावर भर देणाऱ्या या करारामुळे सागरी उद्योगासाठी आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळाची निर्मिती होऊन, ‘ब्लू इकॉनॉमी’ वाढीला चालना मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि किनारपट्टी भागातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि भारताची सागरी शक्ती अधिक मजबूत होईल. ‘नोव्हा मेरीटाईम अकादमी’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिनानाथ जागडे म्हणाले की या करारानुसार सागरी उद्योगात सातत्याने होत असलेली तांत्रिक प्रगती आणि बदलांशी सुसंगत असे अभ्यासक्रम तयार करून कर्मचाऱ्यांची कौशल्ये अद्ययावत ठेवण्यावर विशेष लक्ष दिले जाईल. यामुळे भारतीय नाविक आणि बंदर कर्मचारी जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम होतील. याचा थेट फायदा खलाशी, बंदर कामगार आणि सागरी उद्योगातील कर्मचाऱ्यांना होणार आहे.
करारानुसार अभ्यासक्रमाची रचना, शैक्षणिक संलग्नता, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांना पदवी आणि प्रमाणपत्रे प्रदानतेची जबाबदारी विद्यापीठाची असेल. ‘नोव्हा मेरीटाईम अकॅडमी’ प्रशिक्षणाची गुणवत्ता, शिस्त, अत्याधुनिक सॉफ्टवेअर साधने, प्रकल्प-आधारित शिक्षण आणि व्हर्च्युअल लॅबची सुविधा सुनिश्चित करणे, पात्र प्राध्यापक आणि प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचे काम करेल. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाचे सर्व साहित्य आणि आवश्यकतेनुसार वसतिगृह व भोजन सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना नोकरी व आंतरवासियता मिळवून देण्याचे काम देखील एनएमए करेल. यावेळी ‘नोव्हा मेरीटाईम अकादमी’चे सहाय्यक संचालक श्री. राकेश चव्हाण, व्यवस्थापक श्री. अजित सावंत, जेएनपीएचे उपमहाव्यवस्थापक श्री. आर. आर. गायकवाड, विद्यापीठाचे कुलसचिव श्री. दिलीप भरड, निरंतर विद्याशाखेचे संचालक डॉ. जयदीप निकम, विद्यापीठ सल्लागार श्री. जयवंत ढवळे, अंतर्गत गुणवत्ता व आश्वासन केंद्राचे संचालक डॉ. मधुकर शेवाळे, डॉ. हेमंत राजगुरू, श्रीमती सोनाली पाटील, श्रीमती सुजाता मोरे, श्री. मनोहर पवार, श्रीमती वर्षा पाटील उपस्थित होते.