नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि भारतातील आघाडीचे ऑनलाईन शिक्षण व्यासपीठ असलेल्या फिजिक्सवाला यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार एम.बी.ए., एम.सी.ए., बी.सी.ए. आणि एम. ए. (इंग्रजी) असे चार ऑनलाईन शिक्षणक्रम संयुक्तरित्या विकसित करण्यात येणार आहेत.
या प्रसंगी बोलताना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले की फिजिक्सवाला या अग्रगण्य शिक्षणसंस्थेसोबतचा हा करार मुक्त विद्यापीठाच्या वाटचालीत एक मैलाचा दगड ठरेल. गुणवत्तापूर्ण, सुलभ, व्यावहारिक व उद्योगानुरूप जागतिक दर्जाचे ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ही भागीदारी विद्यापीठाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांचा विस्तार आणि प्रभाव लक्षणीयरीत्या वाढवणार असल्याचेही ते म्हणाले. फिजिक्सवालाचे मुख्य व्यवसाय अधिकारी आदित्य अग्रवाल यांनी मुक्त विद्यापीठाचे लाखोंच्या संख्येत असलेले विद्यार्थी आणि राज्यभर असलेले अभ्यासकेंद्राचे जाळे, दर्जेदार अध्ययन साहित्य निर्मिती क्षमतेमुळे भागीदारीतील हे चार ऑनलाईन शिक्षणक्रम व्यापक प्रमाणावर पोहोचतील अशी आशा व्यक्त केली.
यावेळी फिजिक्सवाला शिक्षण संस्थेचे संदीप मिरियाला, सोनवीर सिंह आणि कविता सिंह तसेच मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव श्री. दिलीप भराड, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, संगणकशास्त्र विद्याशाखेचे संचालक श्री. माधव पलशीकर, मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेचे संचालक नागर्जुन वाडेकर, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे संचालक डॉ. सुरेंद्र पाटोळे, विज्ञान विद्याशाखेच्या संचालिका डॉ. चेतना कमळसकर, अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्राचे संचालक डॉ. मधुकर शेवाळे, , मूल्यमापन विभागाचे डॉ. सज्जन थूल, ग्रामीण विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रा. कैलास मोरे, उपक्रम समन्वयक तथा स्कूल ऑफ डिजिटल एज्युकेशनचे प्रा. गणेश लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.