नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता एमबीए, एमसीए, बीसीए व बी. एस्सी. डाटा सायन्स या शिक्षणक्रमांची प्रथम वर्षासाठी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार या सर्व शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी संबंधित प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. एमबीए प्रवेशासाठी दिनांक १९ जुलै २०२५ तर एमसीए, बीसीए व बी. एस्सी. डाटा सायन्स या शिक्षणक्रमांसाठी दिनांक १३ जुलै २०२५ ही अंतिम मुदत आहे, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांनी दिली आहे.
एमबीए शिक्षणक्रमासाठीचे ऑनलाइन प्रवेश २० जून २०२५ पासून सुरू झाले आहेत. त्याची प्रवेश परीक्षा नोंदणी दिनांक १९ जुलै २०२५ पर्यंत उपलब्ध असेल. प्रवेश परीक्षा ही दिनांक २० जून २०२५ ते २१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. ही परीक्षा १०० गुणांची असून, प्रत्येक प्रश्नाला २ गुण असतील आणि नकारात्मक गुणांकन (निगेटीव्ह मार्किंग) पद्धत लागू राहणार नाही. एकूण ६० पैकी ५० प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. परीक्षेचा कालावधी जास्तीत जास्त ६० मिनिटे असेल. प्रवेश परीक्षा शुल्क रु. ६००/- असून, अनुत्तीर्ण झाल्यास पुन्हा रु. ६००/- शुल्क भरून परीक्षा देता येईल. एमसीए, बीसीए व बी. एस्सी. डाटा सायन्स या शिक्षणक्रमांसाठीचे प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी दिनांक १३ जुलै २०२५ पर्यंत २४ तास उपलब्ध असेल. प्रवेश परीक्षा ही दिनांक १७ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. एकूण १०० गुणांसाठी प्रत्येकी दोन गुणांचे ५० प्रश्न विचारले जातील आणि सर्व ५० प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. परीक्षेचा कालावधी जास्तीत जास्त ५० मिनिटे असेल. प्रवेशास पात्र होण्यासाठी किमान ४० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे. प्रवेश परीक्षा शुल्क रु. ५००/- असून, तीन प्रयत्नात अनुत्तीर्ण झाल्यास पुन्हा रु. ५००/- शुल्क भरून परीक्षा देता येईल. नोंदणीसाठी https://ycmapp.ycmou.org.in/login या लिंकचा वापर करावा.
उमेदवारांनी नोंदणी करण्यापूर्वी संबंधित माहितीपुस्तिकेमध्ये नमूद केलेली शिक्षणक्रमाची पात्रता असल्याची खात्री करूनच नोंदणी करावी, नोंदणी केल्यानंतर उमेदवारास सराव परीक्षा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतरच प्रवेश परीक्षा देता येईल. प्रवेश घेताना इतर शैक्षणिक कागदपत्रांसह प्रवेश परीक्षेत पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक राहील. परीक्षेसंदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास हेल्पलाईन क्रमांक ८०५५२५३०७२, ७४४७४५७१९४ वर संपर्क साधावा. देयका (पेमेंट) संदर्भात ycmou_support@unisuite.in या ईमेल आयडीवर संपर्क करावा. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला www.ycmou.ac.in किंवा https://ycmou.digitaluniversity.ac भेट द्यावी, वरील दोन्ही प्रवेश परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव श्री. दिलीप भरड यांनी केले आहे.