नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचा प्रजापिता ब्रह्मकुमारी या धार्मिक संस्थेसोबतचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम वादात सापडला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यास विरोध केला असून तशा आशयाचे निवेदन विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिले आहे. त्यानंतर विद्यापीठाने हा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती कुलसचिव दिलीप भरड यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे की, मुक्त विद्यापीठाने २९ जानेवारी -२०२५ पासून तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर प्रजापती ब्रम्हकुमारी सोबत घेण्याचे नियोजित केले आहे. यात हैद्राबाद येथे ‘ मेंटल हेल्थ ॲन्ड वेलनेस ॲट वर्कप्लेस’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. त्यासाठी विद्यापीठाचे शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे परिपत्रक विद्यापीठाने काढले आहे. खरे तर शिक्षणाच्या गाभा घटकात व संविधानातही वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा असे ठळकपणे नमूद आहे. परंतु विद्यापीठाने प्रजापिता ब्रम्ह कुमारी सोबत आयोजित प्रशिक्षण शिबीर वैज्ञानिक दृष्टिकोन ह्या मूल्याशी विसंगत आहे. अंधश्रद्धांचा प्रसार करणाऱ्या धार्मिक संस्थेकडून प्रशिक्षण घेणे, हे संविधान विरोधी आहे. म्हणून या कृतीचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीव्र निषेध व्यक्त करीत आहे.
या धार्मिक संस्थेसोबत विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून सहभागी होऊ नये व त्यांचे अंधश्रद्धायुक्त विचार अभ्यासक्रमात समाविष्ट करु नयेत, अशा आशयाचे निवेदन अंनिसने यापूर्वी वेळोवेळी दिलेले आहे. परंतु तरीही विद्यापीठाने अशा संस्थेसोबत सदर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे हे अनाकलनीय व शिक्षणाच्या ध्येय उद्दिष्टांशी विरोधी असल्याचे व सदर कार्यक्रम रद्द करावा,अशी मागणी अंनिसने निवेदनात केली होती.
अंनिसच्या मागणीला अखेर यश आले.त्यानंतर विद्यापीठाने सदरचा कार्यक्रम रद्द केल्याचे व पुन्हा असे कार्यक्रम घेणार नसल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमासारखा पण वैज्ञानिक दृष्टिकोनवर आधारित मनोविकारतज्ज्ञांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याची अंनिसची मागणी विद्यापीठाने मान्य केली. या निवेदनावर अंनिसचे प्रधान सचिव डॉ.ठकसेन गोराणे,राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे ,राज्य पदाधिकारी प्रल्हाद मिस्त्री,जिल्हा कार्यवाह महेंद्र दातरंगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.