नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात देशभरातील सर्व सार्वजनिक मुक्त विद्यापीठांच्या कुलगुरूंची चौथी दोन दिवशीय गोलमेज परिषद संपन्न झाली. त्यात भारतीय सार्वजनिक मुक्त विद्यापीठ महासंघाची (Consortium of All India Public Open Universities) स्थापना करण्यात आली असून तसा ठराव या परिषदेत एकमताने पारित करण्यात आला. सदर महासंघाची रूपरेषा, उद्दिष्ट्ये व कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली एक पाच सदस्यीय अंतरिम समिती बनवण्यात आली आहे. याशिवाय विशेष म्हणजे विद्यापीठाने आपल्या विद्यार्थी परीक्षा व मुल्यांकन यामध्ये ब्लॉकचेन पद्धतीचा अंगीकार करून आणलेल्या पारदर्शकतेचे सर्वच कुलगुरूंनी कौतुक केले. या पद्धतीचा नव्याने निर्मित ‘मुक्त विद्यापीठ महासंघा’द्वारे देशातील सर्व मुक्त विद्यापीठांसाठी अंमलबजावणी करण्याचे सुतोवाच यावेळी करण्यात आले.
कॅनडा येथे आंतरराष्ट्रीय मुख्यालय असलेल्या कोल-सेमका (कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग – कॉमनवेल्थ एज्युकेशनल मिडिया सेंटर फॉर एशिया) चे नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यालय व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ व ७ मार्च २०२५ रोजी ही परिषद विद्यापीठात आयोजित करण्यात आली होती. विद्यापीठाच्या ‘यश-इन आंतराष्ट्रीय परिषद केंद्र’ येथे झालेल्या या परिषदेत श्रीलंका व बांगलादेश येथील मुक्त विद्यापीठांच्या कुलगुरुंसह देशभरातील सार्वजनिक मुक्त विद्यापीठांचे एकूण १४ कुलगुरू, राष्ट्रीय व राज्य स्तरावरील वरिष्ठ शिक्षण अधिकारी सहभागी झाले होते. मुक्त व दूरशिक्षण पद्धतीच्या विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० च्या ऑफलाईन आणि ऑनलाईन अंमलबजावणीचा यशमार्ग’ (पाथवे फॉर द इम्प्लेमेंटेशन ऑफ एनईपी – २०२० इन ओडीएल युनिव्हर्सिटीज : ऑफलाईन आणि ऑनलाईन मोड) असा या परिषदेचा विषय होता.
केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण विभागाचे आर्थिक सल्लागार श्री. मृत्युंजय बेहरा यांच्या ऑनलाईन मार्गदर्शक भाषणाने या परिषदेचा समारोप करण्यात आला. ते म्हणाले की आज तंत्रज्ञान हे मुक्त विद्यापीठांना सहाय्यक ठरत आहे. त्यामुळे पारंपारिक विद्यापीठे देखील मुक्त व दूरस्थ शिक्षण पद्धतीकडे वळत आहेत. मुक्त विद्यापीठांनी प्रादेशिक भाषांमध्ये उच्च शिक्षण उपलब्ध करावे असे आवाहन त्यांनी समारोपप्रसंगी केले. या परिषदेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२०, राज्यस्तरावरील सार्वजनिक मुक्त विद्यापीठांचे संघटन व विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता या तीन प्रमुख मुद्द्यांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या रोजगार संदर्भात औद्यागिक संस्था, छोटे – मोठे उद्योग यांच्याशी त्यांच्या गरजेनुसार संपर्क साधावा, आवश्यकतेनुसार सामंजस्य करार करावे, संबंधित शैक्षणिक साहित्य विकसित करावे आणि प्रशिक्षण वर्ग आयोजित करून विद्यार्थ्यांना रोजगार कसा प्राप्त होईल किंवा ते स्वत: छोटे – मोठे व्यावसायिक म्हणून कसे पुढे येतील याविषयी कार्यवाही करण्याची सुचना मांडण्यात आली.
या परिषदेची फलनिष्पत्ती म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० ची प्रभावी अंमलबजावणी, शैक्षणिक क्षेत्रातील होणारे बदल व स्पर्धा, खाजगी विद्यापीठांचे वाढते जाळे आणि उच्च शैक्षणिक नियामक व संवैधानिक संस्था यांच्यासोबत समन्वय साधण्यासाठीची गरज लक्षात घेता भारतीय सार्वजनिक मुक्त विद्यापीठ महासंघाची (Consortium of All India Public Open Universities) स्थापना करण्यात आली. तसा ठराव या परिषदेत एकमताने पारित करण्यात आला. सदर महासंघाची रूपरेषा, उद्दिष्ट्ये व कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली एक पाच सदस्यीय अंतरिम समिती बनवण्यात आली आहे. त्यात सदस्य सचिव म्हणून हैदराबाद मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. घंटा चक्रपाणी यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून प्रा. राजेंद्र प्रसाद दास (कृष्णकांता हांडिक मुक्त विद्यापीठ, गुवाहाटी, आसाम), प्रा संजय तिवारी (एम. पी. भोज मुक्त विद्यापीठ भोपाल, मध्य प्रदेश) व प्रा. अमी उपाध्याय (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, अहमदाबाद, गुजरात) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर समितीने आगामी ९० दिवसात ‘भारतीय सार्वजनिक मुक्त विद्यापीठ महासंघ’ (Consortium of All India Public Open Universities) विषयी आपला अंतिम अहवाल सादर करावयाचा आहे. या परिषदेत प्रा. शरणाप्पा हाल्से (कर्नाटक मुक्त विद्यापीठ, म्हैसूर), प्रा. व्ही. पी. जगथीराज (श्रीनारायनगुरु मुक्त विद्यापीठ, कोल्लम, केरळ), प्रा. एस. अरुमुगम (तामिळनाडू मुक्त विद्यापीठ, चेन्नई), प्रा. ओ. पी. एस. नेगी (उत्तराखंड मुक्त विद्यापीठ, हलद्वानी), प्रा. उमा कांजीलाल (इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय मुक्त विद्यापीठ), प्रा. सत्यकाम (यु. पी. राजश्री टंडन मुक्त विद्यापीठ, प्रयागराज, उत्तरप्रदेश), प्रा. इंद्रजीत लाहिरी ( नेताजी सुभाष मुक्त विद्यापीठ, कोलकाता), प्रा. डॉ. ए. बी. एम. ओबेदुल इस्लाम (बांगलादेश ओपन युनिव्हर्सिटी, ढाका), प्रा. पी. एम. सी. तिलकरत्ने (श्रीलंका ओपन युनिव्हर्सिटीचे) प्रा. नासीर मोहंमद (अल्लमा इक्बाल मुक्त विद्यापीठ, इस्लामाबाद, पाकिस्तान) यांची देखील भाषणे झाली. श्री. सतीश कुमार भोजाला यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ब्लॉकचेन पद्धतीचे, श्री. अमित रानडे यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे तर प्रा. गणेश लोखंडे यांनी महास्वयंचे सादरीकरण केले.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. जोगेन्द्रसिंह बिसेन, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रा. डॉ. संजीवनी महाले, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांच्यासह सर्व विद्याशाखा संचालक उपस्थित होते. सदर परिषदेचे सूत्रसंचलन प्रा. शुभांगी पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन कुलसचिव श्री. दिलीप भरड यांनी केले. विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्राचे (सेंटर फॉर इंटरनल क्वालिटी एस्युरन्स – सिका) संचालक प्रा. मधुकर शेवाळे यांनी या परिषदेचे संयोजन तर जनसंपर्क अधिकारी श्री. महेंद्र बनसोडे यांनी समन्वयन केले.
या परिषदेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० अंमलबजावणी संदर्भात धोरणात्मक व व्यव्हारात्मक बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. प्रत्येक मुक्त विद्यापीठाच्या चांगल्या उपक्रमांची व शिक्षणक्र्माद्वारे आपापल्या पदवीधर विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठ विद्यापीठांद्वारे होत असलेल्या प्रयत्नांची देखील चर्चा झाली. सर्व मुक्त विद्यापीठांमध्ये सामंजस्य वाढावे या हेतूने’ भारतीय सार्वजनिक मुक्त विद्यापीठ महासंघाची’ (Consortium of All India Public Open Universities) स्थापना करण्यात आली. त्याचे पहिले अध्यक्षपद हे नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुल्गुरूपदास प्राप्त होणे हा आपला बहुमान व मोठी जबाबदारी देखील आहे. या महासंघाच्या माध्यमातून आगामी काळात मुक्त विद्यापीठांमध्ये आपापसात अनुभव, ज्ञान, उपक्रम, तज्ञ शिक्षकांचे, शिक्षणक्रमांचे, अध्ययन साहित्याचे यांची देवाण घेवाण आदानप्रदान करण्यात येईल. २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून भरीव प्रयत्न केले जातील.