मुंबई – भारतातील अनेक प्रांतांमध्ये पूर्वी मुघल राजवट होती. मुघलांना विशेषतः उत्तरेकडील भाग आपल्या ताब्यात घेता आला होता. त्यामुळे दिल्ली, उत्तरप्रदेश या ठिकाणी मुघलांच्या दीर्घकालीन वास्तव्याचे दाखले देणाऱ्या वास्तू आहेत. पण त्याचवेळी उत्खननातदेखील अनेक गोष्टी आढळतात. अलीकडेच ओरिया येथील बहादूरपूरमध्ये खोदकामात सोन्याची १६ व चांदीची २ नाणी सापडली आहेत.
ग्रामवासीयांनी मोहरे व नाणी आढळल्याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी खोदकामाच्या भागाला सुरक्षा प्रदान केली आहे. बहादूरपूर छौंक हे गाव तसे खूप उंचावर वसलेले आहे. या गावातील रहिवासी रामबाबू पाल गुरुवारी आपल्या शेतातील माती उचलण्यासाठी आले होते. थोडेफार खोदकाम केल्यावर त्यांना पिवळ्या धातूची मोठी नाणी आढळली. त्यांनी माती बाजुला केली तर पिवळ्या धातूची १६ व पांढऱ्या धातूची २ नाणी मिळाली. शेतात सोन्याची नाणी सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे काही वेळातच शेतात लोकांची गर्दी झाली. पोलिसांनी हा परिसर आपल्या ताब्यात घेतला आहे. त्यांनी नाण्यांवर प्राचीन ऊर्दू व अरबीमध्ये काही तरी लिहीलेले आहे, असे सांगितले. याची माहिती पुरातत्व विभागाला देण्यात आली आहे.
नाणी नव्हे मोहरे
अलीगड मुस्लीम विद्यापीठातील अभ्यासकांनी शेतात आढळलेली नाणी नसून मोहरे आहेत, असा दावा केला आहे. या मोहऱ्यांवर २९ जुलूस-इटावा असे फारशीमध्ये लिहीलेले आहे. मुघल काळात आणि त्यापूर्वीच्या काळात असे मोहरे बनायचे, असेही त्यांनी सांगितले. २९ जुलूस-इटावा याचा अर्थ संबंधित राजाच्या राजवटीला २९ वर्षे झाली असा असू शकतो, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
यापूर्वीही आढळली नाणी
या गावात पूर्वीही सोने-चांदीची नाणी आढळली आहेत. गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाला त्याच्या शेतात एक महिन्यापूर्वी नाणी आढळली होता. चौकशी केल्यानंतर त्याने ती नाणी पोलिसांच्या स्वाधीन केली.