इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी रस्त्याच्या मधोमध गाडी रोखत नीता अंबानी यांना लग्नासाठी मागणी घातली होती, हे तुम्हाला माहीत आहे का? प्रपोझचा त्यांचा हा किस्सा फारच गंमतीशीर आहे.
मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी नेहमीच चर्चेत असतात. कधी कौटुंबिक कार्यक्रम तर कधी सांस्कृतिक कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय कलाकारांनी कार्यक्रमांना लावलेली हजेरी यामुळे अंबानी कुटुंब नेहमीच चर्चेत असते. अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमांना फिल्मी तडका नेहमीच असतो. हाच फिल्मी तडका मुकेश आणि नीता अंबानी यांच्या लव्हस्टोरीतही आहे.
मुकेश आणि नीता अंबानी यांचे ऍरेंज मॅरेज. हे फार कमी लोकांना माहिती आहे. या दोघांची भेट झाल्यानंतर काही दिवसांतच मुकेश अंबानी यांनी त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्याही पुढे जात मुकेश यांनी रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवत नीता अंबानी यांना प्रपोज केलं होतं. खुद्द नीता अंबानी यांनीच हा किस्सा अभिनेत्री सिमी गरेवाल यांच्या एका ‘टॉक शो’मध्ये सांगितला होता. मुकेश अंबानी यांच्या आई-वडिलांनी एका सांस्कृतिक कार्यक्रमात नीताला नृत्य करताना पाहिलं होतं तेव्हाच त्यांनी नीता यांना आपल्या घरची सून करून घ्यायचं ठरवलं होतं.
असे केले प्रपोज
“आम्ही पेडर रोडवरुन गाडीने जात होतो. मुंबईतील सर्वाधिक वाहतूककोंडी असलेला हा रस्ता आहे. आम्ही जात होतो तेव्हा रात्रीचे ८ वाजले होते. आणि रस्त्यावर खूप गर्दी होती.” त्या भर गर्दीत मुकेश अंबानी यांनी अचानक रस्त्यावर गाडी थांबवली होती. त्यांचं काय सुरू आहे, असा विचार मी करतच होते. तेव्हाच मुकेश यांनी मला माझ्याशी लग्न करशील का? अशी विचारणा केली होती. आमची भेट होऊन तेव्हा फार काही दिवस झाले नव्हते. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि कदाचित करेन असं म्हटलं. यानंतर त्यांनी आताच उत्तर दे, असं सांगितलं.” रस्त्यात लोक ओरडत होते. गाड्यांचे हॉर्न वाजत होते आणि आमची गाडी तिथेच थांबलेली होती. शेवटी मी मुकेश यांचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारल्याचे नीता सांगतात.
नकार असता तर कायमस्वरूपी मित्र
या प्रपोजल नंतर नीता अंबानी यांनी त्यांनी विचारलं की, जर मी तुम्हाला नाही म्हटलं असतं तर तुम्ही मला गाडीतून उतरायला सांगितलं असतं का? त्यावर मुकेश अंबानी यांनी म्हटले की, “नाही मी असं अजिबात केलं नसतं. मी तुम्हाला घरी सोडलं असतं आणि आपण कायमचे चांगले मित्र राहिलो असतो”.
Mukesh Neeta Ambani Love Story