नवी दिल्ली – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जामनगर येथील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या दोन तेल शुद्धीकरण कंपन्यांतून महाराष्ट्रासह इतर राज्यात ट्रकद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करत आहेत. उद्योगांसाठी लागणार्या या ऑक्सिजनमध्ये थोडा बदल करून त्याचा वापर वैद्यकीय सेवेसाठी होऊ शकणार आहे. कोविडमुळे आजारी असलेल्या गरजू रुग्णांना हा ऑक्सिजन दिला जाणार आहे. जामनगरच्या तेल शुद्धीकरण कंपन्यांतून शंभर टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थिती रुग्णांची गरज ओळखून माणुसकीचे दर्शन घडवत कंपनीने मोफत ऑक्सिजनपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
रिलायन्सकडून ऑक्सिजन पुरवठा होत असल्याची पुष्टी राज्याचे शहर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ऑक्सिजन सिलिंडर घेऊन निघालेले ट्रक सध्या रस्त्यात आहेत. स्थानिक प्रशासनाने ट्रकच्या वाहतुकीवर बंदी आणल्यामुळे हे ट्रक जामनगरला फसले आहेत. या ट्रकची संख्या जवळपास ४८ असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यात ऑक्सिजनच्या तुटवड्याबद्दल माहिती दिली होती.
कोच्ची येथील तेल शुद्धीकरण कंपनीतून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनेसुद्धा (बीपीसीएल) केरळसाठी ऑक्सिजनपुरवठा करणार असल्याचे जाहीर केले आहे. बीपीसीएल कोच्ची येथील सरकारी रुग्णालयात १.५ टन ऑक्सिजचा पुरवठा करणार आहे. सरकारी रुग्णालयात मोफत ऑक्सिजनपुरवठा केला जाईल. कोच्ची येथील तेल शुद्धीकरण कंपनीतून द्रव्य रूपातील ऑक्सिजन ९९.७ टक्के शुद्ध तयार केला जातो.
कसा तयार होतो ऑक्सिजन
तेल शुद्धीकरण कंपनी नायट्रोजनच्या उत्पादनासाठी एअर सेपरेशन प्लँटमध्ये औद्योगिक ऑक्सिजन तयार करते. या ऑक्सिजनमध्ये कार्बनडायऑक्साइ़ड आणि इतर वायू हटवून वैद्यकीय वापरासाठी ९९.९ टक्के शुद्ध ऑक्सिजन तयार करतात.