इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड (JPL) आणि एलन मस्क यांच्या स्पेसएक्स यांनी भारतात स्टारलिंक ब्रॉडबँड इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी करार केला आहे. या करारामुळे भारतातील ग्रामीण आणि दुर्गम भागांसह संपूर्ण देशात उपग्रह-आधारित ब्रॉडबँड सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अशा भागांनाही सुलभपणे कनेक्ट करता येईल, जिथे कनेक्टिव्हिटी पुरवणे आव्हानात्मक होते.
या करारातील कंपन्यांपैकी जिओ हे जगातील सर्वात मोठे मोबाइल ऑपरेटर आहे, तर स्टारलिंक हा लो-अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट कॉन्स्टेलेशनचा आघाडीचा ऑपरेटर आहे.
जिओच्या ग्राहकांसाठी स्टारलिंकची सेवा जिओ स्टोअर्समध्ये तसेच ऑनलाइन उपलब्ध असेल. जिओने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, स्पेसएक्ससोबतच्या या करारामुळे संपूर्ण भारतभर विश्वसनीय इंटरनेट सेवा विविध उद्योग, लघु आणि मध्यम व्यवसाय तसेच स्थानिक समुदायांपर्यंत पोहोचवली जाईल. स्टारलिंक जिओएअरफायबर आणि जिओफायबरसाठी पूरक ठरेल, कारण हे दोन्ही नेटवर्क्स वेगवान आणि किफायतशीर हाय-स्पीड इंटरनेट सेवा पुरवतात. तसेच, जिओ आणि स्पेसएक्स भारताच्या डिजिटल इकोसिस्टममध्ये अधिक सहकार्याच्या संधी शोधतील.
रिलायन्स जिओचे ग्रुप सीईओ, मॅथ्यू ओमन म्हणाले,
“भारताच्या प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या आणि हाय-स्पीड ब्रॉडबँड सेवेचा लाभ मिळावा, ही जिओची सर्वोच्च प्राथमिकता आहे. स्टारलिंकला भारतात आणण्यासाठी स्पेसएक्ससोबतची आमची भागीदारी ही आमच्या वचनबद्धतेला बळकटी देणारी आहे. ही भागीदारी अखंडित ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. जिओच्या ब्रॉडबँड इकोसिस्टममध्ये स्टारलिंकचा समावेश करून आम्ही आपली सेवा आणखी विस्तारित करत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) युगात, उच्च-गती ब्रॉडबँड सेवांची विश्वासार्हता आणि पोहोच वाढवून आम्ही देशभरातील समुदाय आणि उद्योगांना सक्षम बनवत आहोत.”
स्पेसएक्सच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ग्वेने शॉटवेल यांनी सांगितले, “भारताची कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या जिओच्या वचनबद्धतेचे आम्ही कौतुक करतो. आम्ही जिओसोबत काम करण्यास उत्सुक आहोत आणि भारत सरकारकडून परवानगी मिळवून नागरिक , संस्था आणि व्यवसायांना स्टारलिंकच्या उच्च-गती इंटरनेट सेवांचा लाभ मिळवून देण्यास तत्पर आहोत.”
हा करार स्पेसएक्सला भारतात स्टारलिंक सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक सरकारी परवानग्या मिळाल्यानंतर अंमलात येईल.