विशेष प्रतिनिधी, मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (आरआयएल) वार्षिक सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली असून त्यात चेअरमन मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. बहुप्रतिक्षित असलेला रिलायन्स जिओ आणि गुगलचा 5G स्मार्ट फोन (जिओ फोन नेक्स्ट) येत्या गणेश चतुर्थीच्या दिवशी लॉन्च केला जाणार आहे. तसेच, जगातील हा सर्वात स्वस्त फोन राहणार असल्याचा दावाही अंबानी यांनी केला आहे. गेल्या वर्षीच्या सर्वसाधारण बैठकीत अंबानी यांनी स्वस्त 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली होती.
असा असेल जिओ फोन नेक्स्ट
नवीन फोन हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन असेल. गुगलच्या मदतीने हा फोन बनवला जात आहे. फोनमध्ये अँड्रॉइड वन ऑपरेटिंग सिस्टम दिले जाऊ शकते. तसेच जिओ बुक लॅपटॉप आणि जिओ बुक लॉन्च होणे अपेक्षित आहे. जिओ 5G फोनला २.४ इंचाचा टीएफटी डिस्प्ले देण्यात येईल. त्याचे रिझोल्यूशन ३२०X२४० पिक्सल आहे. फोन ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी स्टोरेजसह येईल. या फोन मध्ये फोटोग्राफीसाठी कॅमेरा म्हणून फोनमध्ये २ एमपीचा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. सदर फोन ५००MB रॅम आणि ४ जीबी इनबिल्ट स्टोरेजसह देऊ केला जाऊ शकतो. प्रोसेसर म्हणून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४८० 5G चा वापर केला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये २०००mAh बॅटरी दिली जाऊ शकते. यूट्यूब आणि व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोन प्री-लोड वैशिष्ट्यांसह दिले जाऊ शकते. Jio 5G फोनची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु २५०० ते ५००० रुपयांच्या दरम्यान किंमत असू शकते.
अंबानी म्हणाले की
रिलायन्स जिओ हा जगातील सर्वात मोठा मोबाईल डाटा कॅरिअर बनला आहे. महिन्याला ६३० कोटी जीबी डाटा वापरला जात आहे. या वर्षात जिओने तब्बल ३७.९ दशलक्ष नवे ग्राहक मिळविले आहेत. रिलायन्स जिओ सध्या ४२५ दशलक्षाहून अधिक ग्राहकांना सेवा देत आहे. जिओ प्लॅटफॉर्मचा निव्वळ नफा तब्बल ८६ हजार ४९३ कोटी रुपये एवढा आहे.