नाशिक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची शैक्षणिक वर्ष २०२१-२२ एकूण ६७ सत्र शिक्षणक्रमांच्या हिवाळी परीक्षा ऑनलाईन प्रॉक्टर पध्दतीने ८ ते १९ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षेच्या दरम्यानच्या विद्यार्थ्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्याची नोंद सिस्टममध्ये घेण्यात येईल. त्याची पडताळणी करून विद्यार्थ्यांने गैरप्रकार केल्याचे निर्दशनास आल्यास त्याला प्रमाद समितीला सामोरे जावे लागणार आहे. याबाबत विद्यापीठाच्या पोर्टल सविस्तर सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
दिनांक २१ डिसेंबर २०२१ ते दिनांक ९.१.२०२२ या कालावधीत झालेल्या परीक्षेत देखील प्रॉक्टर पध्दतीचा वापर करण्यात आला होता. उपरोक्त डिसेंबर २०२१ च्या परीक्षा कालावधीत एकूण ४१ हजार ८०३ परीक्षार्थी आणि १ लाख १६ हजार ५५५ इतक्या उत्तरपुस्तिका होत्या. ह्यामध्ये सॉफ्टवेअरद्वारे प्रॉक्टर पध्दतीतून ३९० विद्यार्थ्यांनी ५ पेक्षा अधिक वेळा वॉर्निंग देऊन देखील गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ह्या परीक्षेचा निकाल जाहीर होऊनही संबंधिताचा निकाल गैरप्रकारामुळे ३९० विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला असून परीक्षा गैरप्रकार समितीसमोर संबंधितांच्या केसेस ठेवण्यात आलेल्या आहेत. चौकशी समीतीच्या निर्णयानंतर संबंधितांचा निकालावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
परीक्षा दोन सत्रात
परीक्षा वेळापत्रकानुसार सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात पाच तासाच्या स्लॉटमध्ये असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या उपलब्धतेनुसार ही परीक्षा द्यावयाची आहे. ह्या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता कायम करण्यात आलेली आहे, तसेच ज्यांना कायमनोंदणी क्रमांक प्राप्त झाला आहे, त्यांचीच परीक्षा होणार आहे. प्रोविजनल पात्रता झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल मात्र त्यांचे निकाल जाहीर होणार नाही, प्रोविजनल प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासकेंद्रांशी संपर्क करून पात्रतेची कागदपत्रे विद्यापीठाच्या [email protected] ह्या मेलवर पाठवून आपला प्रवेश तात्काळ कायम करून घेता येईल. काल दिनांक ३ फेब्रुवारी २०२२ पासून मॉक टेस्ट व संबंधित सूचना विद्यापीठ पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. ३ ते ८ फेब्रुवारी २०२२ ह्या कालावधीत मॉक टेस्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक सहाय्य
विद्यापीठाच्या विविध आठही विभागीय केंद्रावर प्रत्येकी ४ तांत्रिक सहायकांची विद्यार्थ्यांच्या तांत्रिक सहाय्य करण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली असून त्याची यादी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचे संपर्क क्रमांक, ईमेल आयडी, पीपीटी, डेमो लिंक, ड़ेमो व्हिडीओ इत्यादी माहिती तसेच ह्या परीक्षेचे सर्व शिक्षणक्रमांचे वेळापत्रक विद्यापीठ पोर्टलवर Examination या टॅबमध्ये परीक्षा फेब्रुवारी २०२२ या बटनावर उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार न करता, भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी असे आवाहन कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे आणि परीक्षा नियंत्रक भटु प्रसाद पाटील यांनी केले आहे. ८ फेब्रुवारी २०२२ ते दिनांक १९ फेब्रुवारी या कालावधीत होत असलेल्या परीक्षेसाठी एकूण ६७ शिक्षणक्रमांसाठी एकूण ७७ हजार ७८९ विद्यार्थी आणि संबंधित विद्यार्थ्यांच्या साधारणपणे २ लाख ६१ हजार २९९ उत्तरपुस्तिका असणार आहेत.