नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र – 2022 मध्ये घेण्यात आलेल्या दंत विद्याशाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या व्दितीय, तृतीय व चतुर्थ वर्ष परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिर करण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांनी सांगितले की, विद्यापीठ कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. या अनुषंगाने उत्तरपत्रिकांचे ऑनस्क्रिन इव्हॅल्युएशन करण्याची पध्दत विद्यापीठातर्फे राबविण्यात आली आहे. हिवाळी सत्र 2022 मध्ये संचलित दंत अभ्यासक्रमाच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे प्रायोगिक तत्वावर लेखी परीक्षेच्या दिवशी स्कॅनिंग करण्यात आले.
विद्यापीठाचे 29 संलग्नित दंत महाविद्यालयातील सुमारे चौदा हजार उत्तरपत्रिका ऑनलाईन प्रणालीद्वारे तपासणी करण्यात आली. यासाठी महाविद्यालयांमध्ये डिजिटल इव्हॅल्युएशन सेंटरची उभारणी करण्यात आली होती. सदर प्रणाली यशस्वीपणे राबविण्यात आली असून हिवाळी सत्रातील दंत अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल प्रात्यक्षिक परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी विद्यापीठाचे संकेतस्थळावर www.muhs.ac.in जाहीर करण्यात आला आहे. सदर ऑनस्क्रिन इव्हॅल्युएशन पध्दतीचा वापर उन्हाळी सत्र -२०२३ परीक्षेत करीता राबविण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. विद्यापीठाच्या इतिहासातील जलदगतीने निकाल जाहीर होण्याचा हा उच्चांक असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठात राबविण्यात आलेल्या ऑनस्क्रिन इव्हॅल्युएशन ऑफ अॅन्सर बुक प्रणालीचे कार्य यशस्वीतेसाठी परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, उपकुलसचिव श्री. महेंद्र कोठावदे, सहायक कुलसचिव श्री. प्रमोद पाटील, कक्ष अधिकारी श्री. विजय जोंधळे व श्री. दिपक सांगळे, वरीष्ठ लिपिक श्रीमती चंदा भिसे, लिपिक श्री. सुरेश पवार यांचे अभिनंदन करण्यात आले.
MUHS Result Declared Within One Day After Exam