विशेष प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून ४९२३ डाॅक्टर व ६८८ नर्सेस रुग्ण सेवेकरीता उपलब्ध झाले आहेत. विद्यापीठाचा हिवाळी सत्र – २०२० मधील वैद्यकीय व बी.एस्सी नर्सिंग अंतीम वर्ष पदवी अभ्यासकमाचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला आहे. वैद्यकीय विद्याशाखेच्या अंतीम वर्षात ९४.०६ टक्के विद्यार्थी तसेच बेसिक बी.एस्सी नर्सिग अभ्यासक्रमाचे ७६.५९ टक्के तर पोस्ट बी.एस्सी. अभ्यासक्रमाचे ५६.३५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डाॅ. नितीन करमाळकर, कुलसचिव डाॅ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डाॅ. अजित पाठक , विद्यापीठ प्राधिकरण सदस्य व अधिकारी वर्गांने अभिनंदन केले आहे.
याबाबत माहिती देतांना विद्यापीठाचे मा. कुलसचिव डाॅ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी विद्यापीठाचे मा. प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. श्री. अमित देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदर परीक्षासंदर्भात काम युध्दपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे. जेणेकरुन कोविड-१९ करीता प्रशिक्षित मनुष्यबळ लवकर उपलब्ध होईल. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे मा. सचिव श्री. सौरभ विजय व वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डाॅ. तात्याराव लहाने यांनी दिलेल्या निर्देशानुसार या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विशेष कोविड प्रशिक्षण देखील घेण्यात आले आहे कोविड-१९ संदर्भात आरोग्य सेवा देण्यासाठी नवीन डाॅक्टरांची व नर्सेस यांची आरोग्य यंत्रणेला मदत होईल.
वैद्यकीय विद्या शाखेच्या अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्याना आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून चार दिवसाचे कोविड-१९ संदर्भात विषेष ऑनलाईन प्रशीक्षण देण्यात आले आहे. या प्रशीक्षणात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डाॅ. तात्याराव लहाने, डाॅ. दिलीप कदम, डाॅ. श्रीराज तळवलकर, डाॅ. रुपाली साबळे, डाॅ. गीता नटराज, डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, डाॅ. प्रसाद देशपांडे, डाॅ. अषोक गुप्ता, डाॅ. संतोष सलागरे, डाॅ. आश्विनकुमार तुपकरी, डाॅ. युवराज भोसले, डाॅ. पद्मजा मराठे, डाॅ. रविंद्र देवकर यांनी प्रशीक्षणात कोविड संबंधिची सद्य स्थिती, कोविड प्रतिबंधाकरीता लसिकरण, स्वतःची काळजी, आऊटब्रेक मॅनेजमेंट, कोविड-1९ मायक्रोबायोलाॅजीकल डायग्नोसिस, क्लिनिकल सिड्रोंम, ऑक्सिजन मॅंनेजमेंट, इंटेंसिव्ह केअर मॅनेजमेंट, पॅन्डेमिक मॅनेजमेंट क्राइसिस, सोशल अवेअरनेस फोर मेडिकल स्टुडन्ट आदी विषयांवर मार्गदर्शन केले आहे.
निकालांबाबत माहिती देतांना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डाॅ. अजित गजानन पाठक यांनी सांगितले की, हिवाळी सत्र – २०२० मधील अंतीम वर्षाचा वैद्यकीय व बी.एस्सी नर्सिंग विद्याशाखेचा पदवी अभ्यासकमाचा निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकतस्थळावर जाहिर करण्यात आला आहे. सदर अंतीम वर्षाची परीक्षा माहे मार्च २०२० मध्ये घेण्यात आली होती. केंद्रीय परिषद व शासनाने निर्देशीत केलेल्या सूचनांचे पालन करुन परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते.
हिवाळी सत्र- २०२० मध्ये अंतीम वर्ष वैद्यकीय विद्याशाखा परीक्षेसाठी ५२३४ इतके परीक्षार्थी होते यापैकी ४९२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९४.०६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अंतीम वर्षाच्या परीक्षा संपल्यानंतर केवळ एका दिवसातच विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला आहे. सदरील विद्यार्थ्यांना एक वर्षाचा अंतरवासियता अभ्यासक्रम करावा लागणार आहे. अंतरवासियता अभ्यासक्रमात ते कोविड रुग्ण सेवा करु शकणार आहेत.
अंतिम वर्ष बेसिक बी.एस्सी नर्सिंग विद्याशाखेसाठी ७०९ परीक्षार्थी होते यापैकी ५४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ७६.५९ टक्के निकाल लागला आहे तसेच पोस्ट बेसिक बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रम परीक्षेसाठी २५२ परीक्षार्थी होते १४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ५६.३५ टक्के निकाल लागला आहे.
विद्यापीठाकडून नर्सिंग परीक्षांचा निकाल हा परीक्षा संपल्यानंतर केवळ आठ दिवसातच जाहीर करण्यात आला आहे. सदरील विद्यार्थ्यांना अंतरवासियता अभ्यासक्रम लागु नाही. कारण त्यांच्या अभ्यासक्रमातच अंतरवासियता प्रशिक्षणाचा अंतर्भाव आहे. सदरील उत्तीर्ण विद्यार्थी हे शासकीय व खाजगी सेवेत रुजु होण्यासाठी पात्र ठरले आहेत.
हिवाळी सत्र- २०२० चे अंतीम वर्ष वैद्यकीय व अंतीम वर्ष बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द करण्यात आले आहे. परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे विद्यापीठाकडून अभिनंदन व भविष्यातील वाटचालीकरीता शुभेच्छा देण्यात येत आहेत. सदर परीक्षा संबंधीत कामकाज यशस्वी करण्यासाठी मा. कुलगुरु यांचे मार्गदर्शन तसेच, विद्यापीठाचे उपकुलसचिव श्री. महेंद्र कोठावदे, डाॅ.संतोष कोकाटे, श्री. प्रमोद पाटील, श्रीमती ज्योती इटनकर, श्री. रत्नाकर काळे, श्री. मुकुंदा मुळे, श्री. सतिश केदारे, श्री. संजय सोमवंशी श्री. नरेंद्र सोनवणे, श्रीमती वनिता शार्दुल, श्रीमती अर्चना निकम, श्री. मनोज कोतवाल यांनी परिश्रम घेतले आहेत.