विशेष प्रतिनिधी, नाशिक
कोविड-19 च्या कारणाने हिवाळी-2020 सत्रातील परीक्षेस अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी-2020 सत्रातील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरीता विद्यापीठाकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, परीक्षा कालावधी दरम्यान कोविड-19 अहवाल सकारात्मक आलेले विद्यार्थी अथवा कोविड महामारीच्या कारणाने अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून विशेष लेखी पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर लेखी परीक्षा दि.30 जुलै ते दि.17 ऑगस्ट 2021 दरम्यान घेण्यात येईल. मा. न्यायालयाच्या आदेशान्वये व शासनाने कोविड-19 संदर्भात निर्देशित केलेल्या सुरक्षा नियमांचे पालन सदर परीक्षा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाकडून घेण्यात येणाÚया पुर्नपरीक्षेसाठी राज्यात एकूण 86 परीक्षाकेंद्र निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी केंद्रनिरीक्षक, केंद्रप्रमुख, कनिष्ठ व वरिष्ठ पर्यवेक्षक, भरारी पथक यांची विद्यापीठाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. कोविड-19 अहवाल सकारात्मक आल्यामुळे जे विद्यार्थी हिवाळी 2020 सत्रातील प्रात्यक्षिक परीक्षेला मुकले किंवा मुकणार आहेत, अशा विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर त्यांचा विलगीकरण कालावधी समाप्त झाल्यानंतर घेण्यात येईल.
विविध विद्याशाखांची हिवाळी-2020 सत्राच्या लेखी परीक्षेस नुकताच प्रारंभ झाला आहे. विद्यापीठाकडून पदवी अभ्यासक्रमासाठी सर्व विद्याशाखांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या लेखी परीक्षा घेण्यात येत आहेत. तसेच सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी व मॉडर्न मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स या पदविका अभ्यासक्रमांच्या घेण्यात येत आहेत. याबाबत विद्यापीठाचे अधिकृत www.muhs.ac.in संकेतस्थळावर अधिक माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. विशेष परीक्षेचे वेळापत्रक लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
कोविड-19 ने प्रभावित विद्यार्थ्यांच्या पुर्नपरीक्षाबाबत विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर, मा. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी मार्गदर्शन केले तसेच परीक्षेविषयीचे कामकाज यशस्वी करण्यासाठी सहायक कुलसचिव श्री. महेंद्र कोठावदे, सहायक कुलसचिव श्री. राजेंद्र शहाणे, डॉ. संतोष कोकाटे, कक्ष अधिकारी श्री. दिपक सांगळे, श्रीमती चंदा भिसे, श्री. सतिष केदारे, श्री. किशोर जोपळे, श्री. मनोज कोतवाल यांनी परिश्रम घेतले आहेत.