नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझादा मैदानावर उपोषणाला बसले असून आज दुसरा दिवस आहे. पण, आरक्षणाबाबत नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी वेगळी भूमिका मांडली. त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको आहे, मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण हवे आहे, त्यासाठी ओबीसीतून आरक्षण देण्याची गरज नाही. मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी भूमिका मुधोजी राजे भोसले यांनी स्पष्ट केली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शुभेच्छा आहेत; मात्र ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही विरोध करतो, असेही मुधोजी राजे भोसले म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जे काम केले, ते खरंच कौतुकास्पद आहे. आता न्यायालयात टिकेल असेच आरक्षण मराठा समाजाला हवे आहे, आणि त्यावर मराठा समाज ठाम आहे, असे नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी सांगितले.
राजे तुम्ही किती आंदोलनं केलीत गरजवंत मराठा साठी……
ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत त्यांना OBC मधून आरक्षण मिळाल्यानंतर राहिलेल्या मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण मिळावं यासाठी तुम्ही आंदोलन करा… उपोषण करा नक्कीच कुणबी मराठा आणि राहिलेला मराठा समाज आपलं स्वागत करेल अशी प्रतिक्रिया निलेश जगदाळे यांनी यावर दिली आहे.