नाशिक – नोंदणी महानिरीक्षक श्रावण हार्डीकर यांची नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे व सर्व पदाधिकारी यांनी व्दारका येथील कांदा बटाटा भवन येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी विविध येणा-या अडचणीबाबत या भेटीत चर्चा झाली. यात दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या अडचणी, सर्व्हर पूर्ण क्षमतेने व सुरळीत चालणे, मनपा हद्दीत अजून ०४ दुय्यम निबंधक कार्यालये सुरू करणे व नाशिक बार असोसिएशनला ई -रजिस्ट्रेशनचा परवाना मिळणे या विषयांवर चर्चा झाली. यावेळी हार्डीकर यांनी सर्व्हर सुरळीतपणे पूर्ण क्षमतेने चालू होण्यासंदर्भात युद्धपातळीवर प्रयत्न चालू असून येत्या दोन महिन्यात सर्व्हर सुरळीतपणे चालू होईल असे सांगितले. त्याचप्रमाणे नाशिक मनपा हद्दीतील दोन कार्यालये सकाळ संध्याकाळ शिफ्टमध्ये चालू करण्याचा निर्णय लगेच घेतला जाईल असे सांगितले. त्याचप्रमाणे नाशिक बार असोसिएशनला ई -रजिस्ट्रेशन परवाना देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे सांगितले. या भेटीत सदर मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. यावेळी सह जिल्हा निबंधक कैलास दवंगे, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष वैभव शेटे, सचिव हेमंत गायकवाड, सहसचिव संजय गिते, खजिनदार कमलेश पाळेकर, सदस्य शिवाजी शेळके, प्रतिक शिंदे, महेश यादव आणि वैभव घुमरे आदी उपस्थित होते.