विशेष प्रतिनिधी, मुंबई/पुणे
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातल्यानंतर म्युकरमायोकसिस म्हणजेच काळी बुरशी या आजाराच्या वाढत्या रुग्णांमुळे देशभरात चिंता वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला असताना काळ्या बुरशीचे रुग्णही वाढलेले आहेत. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक या पाच जिल्ह्यांमध्येच म्युकरमायकोसिसचे एकूण ५७ टक्के रुग्ण आढळल्याची धक्कायदायक बाब उघड झाली आहे.
आरोग्य विभागाकडील आकडेवारीनुसार १४ जूनपर्यंत राज्यात एकूण ७३५९ रुग्ण आढळले होते. त्यापैकी पुण्यात सर्वाधिक १२१६, नागपूर ११८४, औरंगाबाद ७००, मुंबई ५९६, नाशिक ५४२ रुग्ण आढळले आहेत. राज्यात ७३५९ रुग्णांमध्ये काळी बुरशीचे गंभीर निदान झाले आहे. या पाच जिल्ह्यांत ४२३८ रुग्ण शहरी आणि ग्रामीण भागात आढळले. याचाच अर्थ पाचही जिल्ह्यांमध्ये ५७ टक्के रुग्ण आढळले आहेत. कोविडच्या दुसऱ्या लाटेत याच पाच जिल्ह्यात सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याचेही आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये काळी बुरशीचे रुग्ण आढळले आहेत. त्यात बुलडाणा ३, पालघर ९, रत्नागिरी १०, रायगड १५, वाशिम १५, हिंगोली १६, परभणीमध्ये १८ रुग्ण आढळले आहेत.
वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने रुग्णालयांमध्ये दाखल झालेले गंभीर कोविड रुग्ण, आयसीयू किंवा अनेक दिवस ऑक्सिजवर असलेल्या रुग्णांनी कोविडपश्चात तपासणी करून घ्यावी असा सल्ला दिला आहे.
नाक, कान अशा अवयवांना प्राथमिकरित्या बाधा पोहोचण्याच्या शक्यतेमुळे ग्लुकोजचे प्रमाण वाढलेल्या रुग्णांनी (२०० एमजी/डील)सुद्धा तपासणी करून घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. रुग्णांच्या निदानानंतर त्यांना टॉसिलिझम्ब औषध देण्यात येत आहे.
राज्याचे आरोग्यसेवेचे आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालकांनी १७ मे रोजी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. देशभरात काळ्या बुरशीसाठी वापरल्या जाणार्या अॅम्फोटेरिसिन बी या औषधामुळे रुग्णांवर दुष्परिणाम दिसत आहेत. पुणे जिल्ह्यात काळ्या बुरशीचे सर्वाधिक रुग्ण आढळलेले असतानाही २० मे ते १० जूनपर्यंत फक्त १२,८३८ अॅम्फोटेरिसिन बी च्या कुप्या मिळाल्या आहेत, अशी माहिती कार्यकर्ते अभिजित मोरे यांनी सांगितले. २१ दिवसांच्या कोर्ससाठी प्रत्येक रुग्णाला दररोज ६ इंजेक्शनची गरज आहे. म्हणजेच ८७८ रुग्णांना १.१० लाख इंजेक्शनची गरज आहे.
राज्यातील सद्यस्थिती
– राज्यात १४ जूनपर्यंत ७३५९ रुग्ण आढळले
– २२१८ रुग्ण बरे झाले
– ६५३ रुग्णांचा मृत्यू झाला
– ४,४८८ रुग्ण उपचाराधीन