विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोविड-१९ च्या उपचारानंतर निर्माण झालेला बुरशीजन्य संसर्ग ब्लॅक फंगस अर्थात म्युकरमायकोसिसचे महाराष्ट्रात ५२ बळी गेल्याची अधिकृत नोंद झाली आहे. ८ रूग्णांचे डोळे गेले असून त्यांची दृष्टी गेली आहे. या आजाराने राज्यात शेकडो रुग्ण ग्रस्त आहेत. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागात चिंतेचे वातावरण आहे.
आरोग्य विभागाने प्रथमच म्युकरमायकोसिसमुळे मृत झालेल्या व्यक्तींची यादी तयार केली असून त्यामध्ये हा आकडा समोर आला आहे. राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर या प्रकारात ५२ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षीही महाराष्ट्रात बुरशी प्रकारामुळे काही जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, आताचा हा संसर्ग अतिशय चिंताजनक असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यात म्युकरमायकोसिसचे सुमारे २ हजार रुग्ण आढळले आहेत. या रूग्णांच्या उपचारासाठी एक लाख अॅम्फोटेरिसिन-बी अँटी-फंगल इंजेक्शन खरेदी करण्यासाठी निविदा पाठविली जाईल. तसेच, महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत या रूग्णांवर विनामूल्य उपचार केले जाणार आहेत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आणि इतर रोगांनी ग्रस्त रूग्ण या आजाराचा बळी पडण्याची शक्यता जास्त असते. अशा रूग्णांच्या उपचारासाठी राज्य सरकारने १८ वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपचारासाठी त्या विषयांमध्ये तज्ज्ञांची आवश्यकता असते, कारण हा बुरशीजन्य संसर्ग नाक, डोळ्याद्वारे पसरतो आणि मेंदूपर्यंत पोहोचू शकतो. त्यादृष्टीने आरोग्य विभाग तयारी करीत आहे.